नेपाळ, चीन, इंधनदरवाढीवर मोदींच्या योगमुद्रा शेअर करत काँग्रेस म्हणते…

मोदींच्या योगमुद्रातून साधला निशाणा

फोटो -महाराष्ट्र काँग्रेस ट्विटर हॅण्डल

देशात करोनाबरोबरच अनेक समस्या उभ्या ठाकल्या आहेत. त्यात चीन व नेपाळ या राष्ट्रांकडून सुरू असलेली घुसखोरी, तर दुसरीकडे दररोज होत असलेली इंधन दरवाढ. यात बिहारमधील निवडणुका तोंडावर आल्या आहेत. या सगळ्यांकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी कशा पद्धतीनं बघतात, असं सांगत काँग्रेसनं मोदींच्या वेगवेगळ्या योगमुद्रा शेअर करत टोला लगावला आहे.

करोना व लॉकडाउनमुळे देशात अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हळूहळू लॉकडाउन शिथिल केला जात असताना सीमेवरील तणाव वाढत चालला आहे. नेपाळनं नकाशात बदल करत काही भारतीय भूभाग स्वतःच्या हद्दीत दाखवला आहे. तर चिनी सैन्यानं गलवान खोऱ्यात घुसखोरी केली होती. या संघर्षात २० भारतीय जवान शहीद झाले आहेत. त्यावरूनही देशातील वातावरण बरंच तापलं आहे. त्याचबरोबर इंधन दरवाढीनं सर्वसामान्यांच्या समस्यांमध्ये भर टाकली आहे.

या सगळ्या मुद्यांकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी कशा पद्धतीनं बघतात यावरून काँग्रेसनं मोदी यांच्या काही योग मुद्रा शेअर करून टीका केली आहे. काँग्रेसनं एक फोटो ट्विट केला असून वेगवेगळ्या परिस्थिती वेगवेगळी प्रतिक्रिया, असं म्हणत मोदींवर निशाणा साधला आहे.

नेपाळ, चीन सीमावाद, इंधनदरवाढ याबरोबरच बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपानं व्हर्च्युअल रॅली आयोजित केली होती. त्यावरूनही काँग्रेसनं मोदींना लक्ष्य केलं आहे. पंतप्रधान मोदी इतर मुद्यांवर मौन बाळगून आहेत, तर बिहार विधानसभा निवडणुकीबद्दल सक्रिय आहेत, अशी टीका काँग्रेसनं फोटोतून केल्याची दिसत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Congress criticised pm narendra modi stand about different issue bmh