पश्चिम विदर्भातील चित्र
अमरावती : पश्चिम विदर्भात भाजप-शिवसेना महायुतीला बंडखोरीचा फटका बसल्याचे दिसत नसले, तरी काँग्रेसला मात्र काही ठिकाणी पक्षांतर आणि बंडखोरीमुळे नुकसान सोसावे लागले आहे. या निवडणुकीत बंडखोरांना वंचित बहुजन आघाडीचा पर्याय उपलब्ध झाल्याने अनेकांनी या आघाडीची वाट धरली, तर काहींनी थेट अपक्ष उमेदवारी दाखल करून पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना आव्हान दिले, पण बंडखोरांपैकी कुणालाही यश मिळालेले नाही.
काही ठिकाणी बंडखोरांमुळे काँग्रेसला मोठा फटका बसला. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे मतदारसंघात काँग्रेसचे नेते नीलेश विश्वकर्मा यांनी काँग्रेसची उमेदवारी मिळणार नाही, हे स्पष्ट होताच वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार वीरेंद्र जगताप यांच्या विरोधात लढत दिली. जगताप यांचा ९ हजार ४१५ मतांनी पराभव झाला. विश्वकर्मा यांना २३ हजार ७७९ मते प्राप्त झाली. भरीस भर काँग्रेसचे आणखी एक बंडखोर माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुईखेडकर यांनी २६६८ मते मिळवली. त्यांनीही जगताप यांच्या अडचणीत भर टाकली.
दर्यापूरमध्ये भाजपचे रमेश बुंदिले यांचा ३० हजार ५१९ च्या मताधिक्याने पराभव झाला असला, तरी भाजपच्या बंडखोर उमेदवार सीमा सावळे यांनी त्यांच्यासमोरील संकटे वाढवली. सावळे यांना १८ हजार ४२९ मते प्राप्त झाली.
यवतमाळ जिल्ह्यात दिग्रसमधून भाजपचे बंडखोर उमेदवार संजय देशमुख यांनी शिवसेनेचे संजय राठोड यांच्यासमोर आव्हान उभे केले खरे, पण संजय राठोड मोठय़ा मताधिक्याने निवडून आले. संजय देशमुख यांना दुसऱ्या क्रमांकाच्या मतांवर समाधान मानावे लागले. वणीमधून शिवसेनेचे बंडखोर विश्वास नांदेकर, सुनील कातकडे यांनाही फारशी चमकदार कामगिरी दाखवता आली नाही.
अकोला पश्चिममधून काँग्रेसचे नेते मदन भरगड यांनी वंचित आघाडीत प्रवेश करून काँग्रेसला आव्हान दिले. तेही या मतदारसंघात पराभूत झाले, पण त्यांनी २० हजारांवर मते मिळवून काँग्रेसच्या उमेदवाराच्या अडचणीत भर टाकली. बुलढाण्यातून शिवसेनेचे माजी आमदार विजयराज शिंदे यांनी देखील वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करून आघाडीतर्फे निवडणूक लढवली. त्यांना दुसऱ्या क्रमांकाची ४१ हजारांवर मते मिळवली, पण ते शिवसेनेच्या उमेदवाराचे नुकसान करू शकले नाहीत. याच मतदारसंघात भाजपची उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी करणारे योगेंद्र गोडे यांना चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
वाशीम जिल्ह्यातील रिसोडमधून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव देशमुख यांनी बंडखोरी केली, पण तेही काँग्रेसच्या उमेदवाराला मात देऊ शकले नाहीत. देशमुख यांना दुसऱ्या क्रमांकाची ६७ हजारांवर मते प्राप्त झाली. वाशीम मतदारसंघात भाजपचे लखन मलिक यांच्या विरोधात शिवसेनेचे शशिकांत पेंढारकर यांनी बंडखोरी केली होती. पण तरीही लखन मलिक निवडून आले. पेंढारकर यांना तिसऱ्या क्रमांकावर ४५ हजार मते प्राप्त झाली.
पश्चिम विदर्भात अनेक ठिकाणी थेट लढती झाल्या. एक-दोन ठिकाणचा अपवाद वगळता भाजपच्या उमेदवारांना बंडखोरीची हानी झाली नाही, पण काँग्रेसला मात्र वंचित आघाडीत पक्षांतर करणाऱ्या स्वपक्षीय उमेदवारांमुळे जागा गमावण्याची वेळ आली, हे निवडणूक निकालांमधून स्पष्ट झाले आहे.