काँग्रेस नेते मिलिंद देवरा भाजपाच्या वाटेवर आहेत का? असा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात विचारला जातो आहे. याचं कारण आहे मिलिंद देवरा यांनी केलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक. मिलिंद देवरा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाऊडी मोदी कार्यक्रमाचं कौतुक केलं आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताची सॉफ्ट पॉवर डिप्लोमसी दाखवून दिल्याचाही उल्लेख आपल्या ट्विटमध्ये केला आहे. त्यामुळे मिलिंद देवरा भाजपाच्या वाटेवर आहेत की काय? असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जातो आहे.  मिलिंद देवरा आणि संजय निरुपम यांच्यात विस्तवही जात नाही हे महाराष्ट्र जाणतो. अशात आता मिलिंद देवरा यांनी जर भाजपाची वाट धरली तर काँग्रेसची वाट आणखी बिकट होणार यात काहीही शंका नाही.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते भाजपात गेले आहेत. आता त्यामध्ये मिलिंद देवरा या नावाचीही भर पडली तर काँग्रेससाठी हा मोठा झटका ठरु शकतो. थँक्यू नरेंद्र मोदीजी असं ट्विट करुन मिलिंद देवरा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं आहे. तसंच माझे वडील मुरली देवरा यांनी भारत आणि अमेरिका यांच्या चांगल्या संबंधांची मुहूर्तमेढ रोवली होती याची आठवणही आपल्या ट्विटमधून करुन दिली आहे. ज्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिलं आहे. मिलिंद देवरा यांचे आभार मानत नरेंद्र मोदी यांनी तुम्ही अगदी योग्य आठवण करुन दिलीत. माझे मित्र मुरली देवरा यांनी भारत आणि अमेरिका यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करण्याची सुरुवात केली असंही मोदींनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान या ट्विटमुळे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना दिलेल्या उत्तरामुळे मिलिंद देवरा हेदेखील भाजपाच्या वाटेवर आहेत का? या चर्चेला राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे. जर मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली तर काँग्रेससाठी तो मोठा झटका ठरणार आहे यात काहीही शंका नाही.