संजीव कुळकर्णी, लोकसत्ता

नांदेड: मराठवाडय़ामध्ये लोकसभेच्या आठ जागांमध्ये काँग्रेस पक्षाचे बळ शून्य. विधानसभेच्या ४६ जागांमध्ये या पक्षाचे आमदार केवळ आठ. एके काळी मराठवाडय़ात अव्वल असलेल्या काँग्रेसची अशी दयनीय स्थिती असतानाही या पक्षाच्या श्रेष्ठींनी गेल्या दोन वर्षांमध्ये या विभागातल्या कार्यकर्त्यांना संधी दिली आहे.

सन २०१४ मधील मोदी लाटेत महाराष्ट्रात काँग्रेसची दाणादाण उडाली; पण तेव्हा या पक्षाला ज्या दोन जागा मिळाल्या, त्या मराठवाडय़ातल्या होत्या. २०१९ मध्ये या दोन जागा काँग्रेसने गमविल्या तरी शंकरराव चव्हाण, चाकूरकर, विलासराव प्रभृतींच्या पुण्याईमुळे गेल्या दोन वर्षांत काँग्रेस श्रेष्ठींनी राज्यसभा किंवा राज्य विधान परिषदेसाठी मराठवाडय़ाला चौथ्यांदा उपकृत केले आहे.

अलीकडे दिवंगत झालेले या पक्षाचे नेते, गांधी परिवाराचे निकटवर्ती राजीव सातव यांनी २०१९ मध्ये हिंगोलीतून लोकसभा निवडणूक न लढता, पक्षसंघटनेच्या कामासाठी अग्रक्रम दिला होता, पण त्यांची हिंगोलीची जागा पक्षाला राखता आली नाही. गुजरातमध्येही पक्षाचा पराभव झाला, तरी पक्षनेतृत्वाने नंतर इतर ज्येष्ठांना डावलून राजीव सातव यांना राज्यसभेवर संधी दिली. दोन्ही आघाडय़ांवर ते सक्रिय दिसत असताना करोनाने अचानक त्यांचा बळी घेतला.

मधल्या काळात विधान परिषदेत, विधानसभा सदस्यांनी निवडून द्यावयाच्या काही जागा रिक्त होणार होत्या तेव्हा काँग्रेस पक्षात एका जागेसाठी शंभराहून अधिक इच्छुक होते. मोठी चुरस निर्माण झाली होती. त्या वेळी नांदेडमधूनही काहींनी मोर्चेबांधणी केली, पण काँग्रेसश्रेष्ठींनी शेवटच्या क्षणी जालन्यातील राहुल गांधी व सातव ब्रिगेडचे तरुण कार्यकते राजेश राठोड यांची वर्णी लावली. त्यांचे वडीलही पूर्वी विधान परिषदेवर होते.

गेल्या मे महिन्यात राजीव सातव यांचे अकाली निधन झाल्यावर राज्यसभेत रिक्त झालेल्या त्यांच्या जागेसाठी महाराष्ट्र तसेच राज्याबाहेरील नेत्यांच्या नावांची चर्चा झाली. राजीव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांचेही नाव त्यात होते; पण मागील काळात बीडच्या रजनी पाटील यांना पूर्ण सहा वर्षे संधी मिळाली नाही म्हणून सातव यांच्या निधनामुळे रिक्त जागेवर पुढील साडेचार वर्षांसाठी त्यांना राज्यसभेवर घेण्याचा निर्णय काँग्रेस अध्यक्षांनी घेतला. त्यातून पुन्हा मराठवाडय़ावर कृपा झाली. अलीकडच्या काळातले हे ठळक उदाहरण मानले जाते.

मराठवाडय़ाच्या तुलनेत विदर्भामध्ये काँग्रेसचे पारडे जड. त्यातच राज्यपाल नामनिर्देशित नियुक्त्या रखडल्यामुळे पक्ष प्रवक्ते सचिन सावंत आणि इतर तिघे ताटकळत बसलेले असताना, ज्येष्ठ नेते शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेची पोटनिवडणूक जाहीर झाल्यावर तेथे कोणत्या भागातील कार्यकर्त्यांला संधी मिळणार, याकडे सर्वाचे लक्ष होते; पण येथेही पुन्हा मराठवाडय़ालाच न्याय मिळाला. राजीव सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा यांना अलीकडे पक्ष संघटनेत उपाध्यक्षपद देण्यात आले होते. आता विधान परिषदेवर त्यांची वर्णी लावत काँग्रेस श्रेष्ठींनी सातव परिवाराला दिलेला शब्द पाळला. महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर मराठवाडय़ातील अनेकांना काँग्रेसने राज्यसभा किंवा विधान परिषद या सभागृहांमध्ये संधी दिली. १९८० ते ९० या दशकात नांदेड जिल्ह्य़ातील सूर्यकांताबाई पाटील आणि विठ्ठलराव जाधव हे राज्यसभेत होते. त्याआधी गो.रा. म्हैसेकरही या सभागृहात होते; पण राज्यसभा किंवा विधान परिषद यांत सलग चारदा मराठवाडय़ावर कृपा करण्याची बाब पहिल्यांदा बघायला मिळाली, तीही अवघ्या दोन वर्षांच्या कालखंडात.