लोकसभा निवडणूक निकालांमध्ये भाजपाप्रणीत महायुतीची मोठी पीछेहाट झाल्याचं पाहायला मिळत आहे. महायुतीला १७ जागा मिळाल्या असून महाविकास आघाडीला ३० जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात नेमकं कुठे चुकलं? यावर भाजपासह सर्वच मित्रपक्षांमध्ये विचारमंथन चालू असल्याचं दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून या विजयाच्या जोरावर विधानसभेत आणखी भरीव कामगिरीची शक्यता वर्तवली जात असतानाच यंदा राज्यात सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी मोठं विधान केलं आहे.

काय आहेत राज्यातील निकाल?

यंदा देशभरात एनडीएला ४०० पार जागा मिळतील, असे दावे भाजपाकडून करण्यात आले होते. प्रत्यक्षात एनडीएला २९३ जागा मिळाल्या असून भाजपाला २४० जागांवर विजय मिळाला आहे. त्याउलट इंडिया आघाडीनं २३० हून जास्त जागांवर विजय मिळवला आहे. एकीकडे देशभरात भाजपाला जवळपास ६३ जागांचा फटका बसलेला असताना महाराष्ट्रातही भाजपाप्रणीत महायुतीची पीछेहाट झाल्याचं दिसून येत आहे.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीला ३० जागा मिळाल्या असून त्यातील १३ काँग्रेस, उद्धव ठाकरे गट आणि ८ शरद पवार गटानं जिंकल्या आहेत. त्याशिवाय सांगलीतून विजयी झालेले अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी महाविकासआघाडीला पाठिंबा दिल्यास मविआची संख्या ३१ होऊ शकते. दुसरीकडे महायुतीला १७ जागा मिळाल्या असून त्यात भाजपाला ९ जागा जिंकता आल्या आहेत. गेल्या निवडणुकीत भाजपाला २३ जागांवर विजय मिळाला होता. त्याशिवाय शिंदे गटाला ७ जागा तर अजित पवार गटाला अवघ्या एका जागेवर विजय मिळाला आहे.

काँग्रेस स्वबळावर लढणार?

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक १३ जागा जिंकणाऱ्या काँग्रेस पक्षानं स्वबळाची तयारी केल्याचं आता बोललं जात आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या एका सूचक विधानामुळे या चर्चांना उधाण आलं आहे. शनिवारी सकाळी माध्यमांशी बोलताना नाना पटोलेंनी काँग्रेस राज्यात सर्व जागांवर तयारी करत असल्याचं विधान केलं आहे.

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघामध्ये हे उमेदवार झाले विजयी, वाचा कुणाला किती मतदान

काय म्हणाले नाना पटोले?

नाना पटोले त्यांच्या मतदारसंघात पाहणी दौऱ्यावर आहेत. यावेळी राज्यातील काँग्रेसच्या तयारीबाबत आणि पुढील राजकीय वाटचालीबाबत माध्यमांनी विचारणा केली असता नाना पटोलेंनी त्यावर प्रतिक्रिया दिली. “महाराष्ट्रात आम्ही सगळीकडे तयारी चालू केली आहे. मी इथला आमदार आहे. मला इथे कामांची पाहणी यावं लागतं. पण महाराष्ट्रातल्या २८८ मतदारसंघात काँग्रेसची विधानसभेची तयारी सुरू झाली आहे”, असं नाना पटोले म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेबाबत संभ्रम

दरम्यान, काँग्रेसच्या याच भूमिकेमुळे नाना पटोलेंनी शनिवारी दुपारी होणाऱ्या मविआच्या पत्रकार परिषदेसाठी जाणं टाळल्याचं बोललं जात आहे. मात्र, आपण मतदारसंघाच्या पाहणी दौऱ्यावर असल्यामुळे आपल्याला तिथे जाता येत नसल्याचं नाना पटोले म्हणाले आहेत. तिकडे विजय वडेट्टीवार यांनी आपल्याला या बैठकीचं निमंत्रणच नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये नेमकं काय चाललंय? याविषयी आता तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.