भाजपा खासदारावर टीका करताना काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी बेवडा खासदार असा उल्लेख करत नव्या वादाला तोंड फोडलं आहे. सोलापूरचे खासदार शरद बनसोडे यांच्यावर टीका करताना त्यांनी हे वक्तव्य केलं. काँग्रेसच्या काळातील केलेल्या कामाचं उद्घाटन दोन्ही मंत्री आणि बेवडा खासदार करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सोलापूरमध्ये एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

‘गेल्या तीन चार वर्षांपासून जी कामं होत आहेत, ती सर्व कामे काँग्रेसच्या काळात झाली आहेत. आमची पाठ वळली की लगेच भाजपा ही कामं आम्ही केली म्हणून सांगायला सुरुवात करेल. यांचे दोन मंत्री यांचं एकच काम आहे. एकमेकांशी भांडणं आणि स्वत:चे गट सांभाळणं. पेपरमध्ये आम्ही केलेल्या कामाची उद्धाटनं करा एवढंच एक काम यांच्याकडे आहे’, असं प्रणिती शिंदे यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना प्रणिती शिंदेंची जीभ यावेळी घसरली. आपल्या देशात मोदीबाबा नावाचा डेंग्यूचा मोठा डास आला आहे अशा शब्दांत त्यांनी मोदींवर टीका केली. आपल्या देशात सर्वात मोठा डेंग्यूचा डास आला आहे, त्यांचं नाव आहे मोदीबाबा, फवारणी करुन या डासाला पुढच्या वर्षी हाकलून लावायचं आहे. त्याच्यामुळे सगळ्यांना आजार होतोय असं प्रणिती शिंदेंनी म्हटलं.

‘मोदींना खोटं बोलण्याची सवय लागली आहे. 15 लाख जमा करुन देतो असं म्हणाले होते, कुठे गेले ते पैसे. नोटाबंदीमुळे सर्वसामन्यांना फटका बसला. मोदींना ना बहिण आहे, बायको आहे ना मुलगी…त्यामुळे त्यांना महिलांना होणाऱ्या त्रासाबद्दल कळणार नाही. आई आहे पण नोटाबंदीवेळी तिला रांगेत उभं केलं ते पण फोटोसाठी. जग फिरतात पण कधी शेतकऱ्यांमध्ये येऊन त्यांची परिस्थिती पाहत नाही’, असं प्रणिती शिंदे यांनी म्हटलं.