काँग्रेसश्रेष्ठींचा कार्यक्रम म्हणून राज्यभर प्रदेश काँग्रेसने सुरू केलेल्या वचनपूर्ती मेळाव्यांचे आयोजन काही जिल्ह्य़ांपुरतेच शक्य झाले असून, पालकमंत्र्यांच्या सहकार्याअभावी मेळावे काही ठिकाणी झालेच नसल्याची बाब मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष यांच्यातील बेबनावामुळेही घडल्याचे स्पष्ट झाले आहे. पक्षाचे उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी केंद्र व राज्य शासनाने केलेल्या विकासकामांना लोकांपुढे नेण्यासाठी वचनपूर्ती मेळाव्यांचे आयोजन करण्याचे निर्देश दिले होते. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी आदेश शिरसावंद्य मानून राज्यभरातील जिल्हा संघटनांना ब्लॉक, तालुका व जिल्हा पातळीवर मेळावे घेण्याचे फ र्मान सोडले. पण, त्यापैकी काहीच जिल्ह्य़ांत जिल्हास्तरीय मेळावे झाले. उर्वरित ठिकाणी तालुका पातळीवरच ‘वचनपूर्ती’ झाली.  जून अखेपर्यंत हे जिल्हा मेळावे घेण्याचे निर्देश होते. तसा लेखी कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. मात्र वर्धा, चंद्रपूर, नागपूर, अमरावती, यासह पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण अशा भागांत जिल्हा मेळावे झालेच नसल्याची बाब पुढे आली आहे.
जिल्हा मेळावे आटोपल्यानंतर विभागीय मेळाव्यांचे आयोजन निश्चित करण्यात आले होते. पण, कोकण, अमरावती व खानदेश असे तीनच विभागीय मेळावे झाले. राज्य पातळीवरच्या मेळाव्याचा उच्चारच नाही. यासंदर्भात माहिती घेतल्यावर जिल्हा मेळाव्यांच्या आयोजनात काँग्रेसच्या संबंधित पालकमंत्री किंवा संपर्कमंत्र्यांनी हात झटकल्यानेच जिल्हाध्यक्षांनी हात आवरते घेतल्याची बाब पुढे आली. काही जिल्हाध्यक्षांनी मेळावा आयोजनासाठी २५ लाख रुपयांचा हिशोब पालकमंत्र्यांपुढे मांडला. हिशोब कागदावरच राहिला. काही जिल्हाध्यक्षांनी जिल्हा मेळाव्यास मुख्यमंत्रीच हवे, असा हट्ट धरल्याने मेळावा बारगळला. प्रदेशाध्यक्षांच्या या अशा कार्यक्रमास मंत्री व काही जिल्हाध्यक्षांनीच खो घातल्याचे यातून स्पष्ट झाले.
प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याकडे विचारणा केल्यावर, त्यांनी काही जिल्ह्य़ांत अद्याप मेळावे झाले नसल्याचे मान्य केले. ते म्हणाले, ह्लकाही विभागीय मेळावे झाले. पालकमंत्र्यांचे सहकार्य नसल्याच्या तक्रारी माझ्यापर्यंत आल्या नाहीत.ह्व वध्र्यात मेळावा झाला नाही. मंत्री सहकार्य करीत नसल्याची बाब ही एक अडचण आहे का? या प्रश्नावर त्यांनी स्पष्ट बोलण्याचे टाळले.
वर्धा येथील मेळावा हा शहर काँग्रेसने म्हणजे खासदार दत्ता मेघे गटाने घेतला. जिल्हा मेळावा झालाच नाही. ही बाब प्रदेशाध्यक्ष व जिल्हाध्यक्षांच्या भूमिकेतून स्पष्ट होते. हाच प्रकार राज्यातील अनेक जिल्ह्य़ांबाबत घडला असून प्रदेशाध्यक्ष व मुख्यमंत्री यांच्यातील कुरघोडी मेळाव्यांना चाप लावणारी ठरल्याचे म्हटले जाते. विभागीय व राज्य पातळीवर मेळाव्यांबाबत असा संभ्रम असतानाच आता प्रदेशाध्यक्षांनी जिल्हा संपर्क अभियान यात्रा हा नवा उपक्रम जाहीर केला आहे. एका उपक्र माचा फ ज्जा उडाला असताना नव्या उपक्रमाची घोषणा करीत प्रदेशाध्यक्ष काँग्रेस कार्यक र्त्यांना काय संदेश देत आहे, अशी शंका काही पदाधिकारी उपस्थित करू लागले आहेत.