scorecardresearch

“…म्हणून हा खटाटोप”, काँग्रेसच्या आंदोलनावर उदय सामंतांची टीका, म्हणाले, “मोर्चे काढलेच पाहिजेत”

राहुल गांधींची बडतर्फी आणि इतर प्रश्नांवर देशाव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे.

Uday samant
राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर त्यांच्या आडनावावरून केलेली टीका काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना भोवली आहे. याप्रकरणी त्यांच्याविरोधात दाखल केलेल्या खटल्याची सुनावणी करताना सुरत कोर्टाने त्यांना दोषी ठरवून दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच त्यांचं संसदेतलं सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे. याविरोधात काँग्रेस देशभर जनआंदोलन करणार आहे. तसेच विविध ठिकाणी काँग्रेसचे नेते-कार्यकर्ते कालपासूनच आंदोलन करू लागले आहेत. या आंदोलनांवरून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने (शिंदे गट) काँग्रेसवर टीका केली आहे.

शिवसेना नेते (शिंदे गट) आणि उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले की, एखाद्या पक्षाच्या प्रमुख नेत्यावर अशी कारवाई झाल्यानंतर आम्ही त्या नेत्याचे किती सच्चे पाईक आहोत दाखवण्यासाठीचा हा खटाटोप आहे. पण शिक्षा झाली नसती तर हा सर्व प्रकार घडला नसता. मला असं वाटतं की, सगळ्यांना सगळं काही माहिती असतं. परंतु आपण त्यांचे किती सच्चे कार्यकर्ते आहोत, निष्ठावंत आहोत हे दाखवण्यासाठी मोर्चे काढलेच पाहिजेत, हा लोकशाहीचा एक भाग आहे.

हेही वाचा… फाडलेला वटहुकुम आता राहुल गांधी यांच्या मुळावर

वादग्रस्त वक्तव्य भोवलं

राहुल गांधी यांनी १३ एप्रिल २०१९ रोजी कर्नाटकातील कोलार येथे निवडणूक प्रचारादरम्यान काढलेल्या रॅलीत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले होते, “नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी यांचे आडनाव एकसारखेच का आहे? सगळ्या चोरांची आडनावं मोदी का असतात?. या विधानाबाबत भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधींविरोधात सुरत सत्र न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला होता. याप्रकरणी बुधवारी अंतिम सुनावणी झाली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-03-2023 at 08:03 IST

संबंधित बातम्या