सांगली : काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. मोहन वनखंडे यांनी अखेर शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश केला असून, त्यांचे मंत्री उदय सामंत यांनी पक्षात स्वागत केले. यावेळी आमदार सुहास बाबर, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आदी उपस्थित होते. सांगली काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली पडझड सुरूच असल्याचे पुढे आले आहे.

प्रा. वनखंडे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी पक्षाने त्यांना उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली होती. मात्र, विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षित यश मिळाले नाही. यामुळे पक्षात काम करणे अशक्य झाल्याचे मत त्यांनी खासगीत व्यक्त केले होते. गेल्या आठवड्यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही आ. इद्रिस नायकवडी, शहर जिल्हाध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे यांच्यासमवेत भेट घेऊन पक्ष प्रवेशाबाबत चर्चाही केली होती. त्याचवेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेतली होती. कार्यकर्त्यांशी चर्चा करून पक्ष प्रवेशाबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी नेत्यांना दिले होते.

यानंतर त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांची बैठक घेऊन राजकीय निर्णय घेण्याबाबत चर्चा केली. यावेळी महायुतीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन कार्यकर्त्यांनी केले. यानुसार त्यांनी बुधवारी रात्री मुंबईत मंत्री सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश केला. यावेळी मंत्री सामंत यांनी सामान्य कार्यकर्त्यांना न्याय देण्याची उपमुख्यमंत्री शिंदे यांची भूमिका असून, योग्य वेळी योग्य संधी दिली जाईल. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रा. वनखंडे यांनी पक्ष प्रवेश करून काँग्रेससोबतचा अल्पकाळाचा घरोबा मोडला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पक्षाला लागलेली गळती थांबेना

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाला मोठी गळती लागली आहे. ज्येष्ठ नेत्या जयश्री पाटील यांच्यासह अनेक माजी नगरसेवक, माजी महापौरांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. दुसरीकडे काहींनी राष्ट्रवादी कॉग्रेस अजित पवारांच्या गटात प्रवेश केला. पक्षाला लागलेली ही गळती थांबवण्यासाठी आ. डॉ. विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांनी नुकताच कार्यकर्त्यांचा एक मेळावा घेत त्यांना पाठीशी असल्याचेही सांगितले. मात्र, यानंतरही पक्षाला लागलेली ही गळती थांबता थांबेना.