बीड : वैद्यनाथ साखर कारखान्याचे बँक खाते गोठवल्याप्रकरणात पंकजा मुंडे समर्थकांनी पुन्हा एकदा नाराजीचा सूर आळवला आहे. कारखान्याच्या आडून पंकजा मुंडेंना बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप समर्थकांनी केला आहे.

परळीजवळील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम भरणा केली नसल्याच्या कारणावरून बँक खाते गोठवण्यात आले. या प्रकरणात क्षेत्रीय भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडून कारवाई केल्याचे स्पष्ट केले असताना कारखान्यांच्या संचालकांनी मात्र कारवाई झाली नसल्याचा दावा केला. या प्रकारामुळे मुंडे समर्थकांनी नाराजीचा सूर आळवला असून या संदर्भात राजाभाऊ मुंडे म्हणाले, की भविष्य निर्वाह निधीची रक्कम दिलेली आहे. यापुढेही ती कामगारांना दिली जाणार आहे. मात्र पंकजा मुंडेंना कोणत्याही माध्यमातून सर्वसामान्यांमध्ये बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. कोणी कितीही कट रचले तरी पंकजा मुंडे सक्षम असल्याचे त्यांनी सांगितले. गेली दोनतीन वर्ष कारखाना बंद असल्यामुळे त्या काळातील राहिलेल्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम काही प्रमाणात भरण्यात आली होती. उर्वरित रक्कम लवकरच भरण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.