न्हावेली-विवरवाडी येथील गणपती मंदिराच्या दर्शनी भागासमोर असलेले मोरीपुल मधोमध खचले होते. अपघात होवू नये यासाठी ग्रामस्थांनी काळजी घेतली. परंतु नव्याने बांधकाम केलेले मोरीपुल खचल्याने सर्वाच्याच भुवया उंचावल्या होत्या. याकडे बांधकाम विभागाने लक्ष दिल्याने या पुलावर पुन्हा नव्याने बांधकाम करण्यात आले आहे. अशा नियोजन अभावी कामांमुळे शासनाचा निधी वाया जात असून याचा भरुदड जनतेस सहन करावा लागत असल्याचे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे. सावंतवाडी तालुक्यात पडलेल्या पावसाने न्हावेलीला झोडपले. याचा फटका विवरवाडी येथील दोन महिन्यापूर्वी बांधकाम केलेल्या पुलाला बसला. हा पूल मधोमध खचल्याने गुरुवारी मोटारसायकलस्वाराचा अपघात झाला . सुदैवाने मोठी हानी न झाली तरी नव्याने केलेले बांधकाम खचल्यामुळे हा अपघात घडला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी यावेळी केला. सकाळच्या सत्रात येणाऱ्या एसटी बसला मात्र अध्र्यावरूनच परतावे लागले तर दिवसभरात येणाऱ्या काही एसटी बस दुसऱ्या माग्रे वळविण्यात आल्या. नवख्या प्रवाशांना याचा मोठय़ा प्रमाणात फटका बसला.
ग्रामीण पायाभूत विकास निधीतून करण्यात आलेल्या न्हावेली नागझरवाडी ते विवरवाडी रस्त्यावरील गणपती मंदिर मार्गाच्या दर्शनी मार्गासमोरील मोरीपूल वाहतुकीस धोकादायक बनले आहे. या कामास एक महिन्यांचा कालावधी झाला असून पुन्हा याच कामासाठी निधी घालण्यात येणार आहे. त्यामुळे प्रशासनाचा लाखो रुपयांचा निधी नियोजनाअभावी निकृष्ट कामामुळे बुडाल्याचा आरोप ग्रामस्थ तसेच प्रवाशांमधून होत आहे.
न्हावेली-नागझरवाडी येथील अजीत रावजी मोहिते हे सकाळी कामासाठी जात असताना उतरणीवर असलेले पुल मधोमध खचल्याचे त्यांच्या अचानक निदर्शनास आहे. परंतु गाडीचा तोल सावरेपर्यंत त्या पुलाच्या खचलेल्या भागात त्यांची मोटारसायकल गेली. आरोस माग्रे जाताना रस्त्याच्या डाव्याबाजूला ते फेकले गेले. त्यांच्या गाडीच्या दर्शनी भागाचे नुकसान होवून त्यांच्या हाताला व पायाला किरकोळ जखम झाली. ग्रामस्थांनी तात्काळ त्यांना उचलून गाडी बाजूला केली व रस्त्याच्या मधोमध दगड व झाडाची फांदी ठेवली. जेणेकरून दुसरा अपघात घडू नये. ग्रामस्थांनी तात्काळ याची खबर संबंधित विभागाला दिल्यामुळे दिवसभरात पुलावर नवीन बांधकाम करण्यात आले.
सावंतवाडी-न्हावेली-आरोंदा मार्गावरील विवरवाडी मोरीपुलावरून रात्रंदिवस वाहतूक सुरु असते. मुळात अरुंद व संरक्षक काठडय़ाविना हे पूल आहे. गेल्यावर्षी भोमवाडी व रेवटेवाडीस जोडणारे मोरीपूल मुसळधार पावसात वाहून गेले होते. त्यामुळे या दोन वाडय़ांचा संपर्क तुटला होता. महिन्याभरापूर्वी नाबार्ड २१ अर्थसहाय्यीत ग्रामीण पायाभूत विकास निधीतून करण्यात आलेल्या न्हावेली नागझरवाडी ते विवरवाडी रस्त्यावरील मोरीपूल कामाची पोलखोल अवकाळी पावसाने केली. त्यामुळे हे काम निकृष्ट झाल्याचा आरोप ग्रामस्थांमधून होत आहे.
मळेवाड जि.प. व न्हावेली पं.स. मतदारसंघातील या लोकप्रतिनिधीनी याकडे लक्ष देऊन पुलाचे नियोजनबद्ध काम करून घेण्याची मागणी प्रवासी, ग्रामस्थ तसेच सर्व स्तरातून होत आहे.
पूल पुन्हा खचण्याची शक्यता
विवरवाडी मोरीपुलाच्या बांधकामात मोठे पाईप वापरण्यात आले आहे. त्यांच्या मधोमध मातीचा भराव न घालता कॉंक्रिट म्निस खडीचा वापर होणे आवश्यक आहे. कारण मातीचा भराव घातल्यास पुन्हा हे पूल खचण्याची शक्यता आहे. सध्या पावसाने वकळ घेतल्याने चांगले काम करण्याची संधी आहे. ठेकेदाराने पुन्हा नव्याने खचलेल्या भागाची दुरूस्ती केल्यास व थोडा काळ गेल्यानंतर पुन्हा खडीकरण व डांबरीकरण केले तरच धोका टळू शकतो, असे काही उपस्थित ग्रामस्थांनी सांगितले.
मडुरा माऊली मंदिर पूल धोकादायक
बांदा-मडुरा-सातार्डा माग्रे जाणाऱ्या मार्गावरील पावसाळ्यात दरवर्षी पूर येणारे मडुऱ्यातील पूल म्हणजे माऊली मंदिर पूल. या पुलाच्या दोन्ही बाजूस संरक्षक कठडा नसल्याने दिवस-रात्र वाहतूक करणाऱ्या वाहनचालक तसेच प्रवाशांसाठी पूल धोकादायक बनले आहे. याकडे प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन संरक्षक कठडा बसविणे तसेच पुलाची उंची वाढविण्याची मागणी सर्वस्तरातून होत आहे. सातार्डा भागाला जोडणारा व शेल्रेसह, रोणापाल, मडुऱ्यातून गोव्याला जाण्यासाठी मडुरा-सातार्डा जवळचा मार्ग आहे. या मार्गावर मडुरा माऊली मंदिराजवळ असणाऱ्या पाटो पुलाचा अडथळा सोडल्यास पूर्ण मार्ग सुस्थितीत आहे. थोडय़ प्रमाणात पाऊस झाला तरी वाहतूक खोळंबते. हे पूल बठे असून दर पावसाळ्यात पाण्याबरोबर येणारा गाळ मोऱ्यांमध्ये साचत असतो. त्यामुळे या पुलाच्या उंचीचे काम हाती घेणे गरजेचे आहे. संरक्षक कठडा भक्कम नसल्याने गेल्या एकावर्षांपूर्वी कणकवली येथे राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. नुकताच या पुलावर अपघात घडला असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. मडुरासारख्या ग्रामीण भागात अशी बरीचशी पूले आहेत. बांदा-मडुरा-सातार्डा माग्रे पेडणे गोवा व सातार्डा-सातोसे-मडुरा माग्रे बांदा येथे जाण्या -येण्यासाठी दिवसरात्र वाहतूक सुरु असते. माऊली मंदिराजवळील या पुलाला संरक्षक कठडा बसविण्याची मागणी ग्रामस्थांमधून वारंवार करण्यात येत आहे. परंतु लोकप्रतिनिधींचे याकडे लक्ष नसल्याने हा पूल धोकादायक बनला असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. पहिल्याच पावसाला या पुलावर पूर येतो आणि सर्व वाहतूक थांबते. त्यामुळे प्रवासी तसेच वाहनचालकांना येथे अपघातातून वाचविण्यासाठी पुलाची उंची व कठडा या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पाटो पुलाची उंची वाढविण्याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रशासनाने या पुलाकडे त्वरित लक्ष देवून अपघात रोखण्यासाठी लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थ, वाहनचालक तसेच प्रवासी अशा सर्वस्तरातून होत आहे.
आतापासूनच बांधकामने नियोजन करावे
काही महिन्यांपूर्वी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी पुलाची पाहणी केल्याचे ग्रामस्थांमधून सांगण्यात येत आहे. आता पावसाळा तोंडावर आल्याने पुलाच्या दुरुस्तीसह उंची वाढविण्याचे कामही करता येण्यासारखे नाही. त्यामुळे आतापासूनच बांधकाम खात्याने नियोजन करणे आवश्यक असल्याचे ग्रामस्थ तसेच प्रवासी वर्गामधून बोलले जात आहे.