प्रशांत देशमुख
वर्धा जिल्ह्य़ात शंभर खाटांची सोय शक्य
वर्धा : खाटांची चणचण नित्याची झाली असतानाच शंभर खाटांची सोय होऊ शकणाऱ्या महिला रुग्णालयाची वास्तू केवळ राजकीय अभिनिवेशापोटी रखडल्याचे वास्तव पुढे आले आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाने २०१३ ला शंभर खाटा क्षमता असणारी महिला रुग्णालयाची वास्तू मंजूर केली. काँग्रेस राजवटीत मंजूर झालेली १ कोटी ४० लाख रुपये खर्चाच्या या वास्तूसाठी अर्थसंकल्पात मात्र तरतूद करण्यात आली नव्हती. सामान्य रुग्णालयावरील भार कमी करण्याच्या हेतूने उपयुक्त ठरणाऱ्या वास्तूकडे आ. डॉ. पंकज भोयर यांनी लक्ष देऊन पाठपुरावा केला. २०१७ ला तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वाढत्या तरतुदीनुसार ९ कोटी रुपये मंजूर केले. पुढे विविध कामाचा अंतर्भाव केल्याने वास्तूची किंमत २१ कोटीवर पोहोचली. आतापर्यंत १३ कोटी खर्च झाले असून ७ कोटी रुपयांची कामे शिल्लक आहेत. मात्र शासनाकडून २०२०-२१ व २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात तरतूद न झाल्याने रुग्णालयास निधी मिळणे अशक्य आहे. कंत्राटदाराला वीस कोटीपैकी बारा कोटी प्राप्त झाले असून चार कोटी रुपये घेणे असल्याने त्याने काम बंद पाडले. बांधकाम विभागाच्या सांगण्यानुसार ८० टक्के काम पूर्ण झाले असून विद्युतीकरण व जुजबी कामे थांबली आहेत. निधी मिळाल्यास चार महिन्यात रुग्णालयाची वास्तू उपयोगात येऊ शकेल. दोन वर्षांत हे काम पूर्ण होण्याची अपेक्षा होती. मात्र सत्ताबदल झाल्यानंतर वास्तूच्या कामास विराम मिळाल्याची स्थिती आहे. भाजप आ.डॉ. भोयर यांचे ‘ब्रेन चाईल्ड’ म्हणून या रुग्णालयाकडे पाहिले जात असल्याने काम थांबल्याची राजकीय चर्चा होते.
या वास्तूत दोन मजल्याचे ८० हजार फु टाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. पर्यावरणपूरक, दोन लिफ्ट, अग्निशमन यंत्रणा यासह शंभर खाटांची सोय राहणार. कोविडचा ताण वाढत असल्याने या वास्तूची अधिकच निकड भासत आहे. सामान्य रुग्णालयात जागेअभावी व्हेंटिलेटर कक्षातच करोना चाचणी केल्या जाण्याची आपत्ती असताना महिला रुग्णालयाचे काम त्वरित होणे अपेक्षित आहे. पालकमंत्री सुनील केदार यांनी वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन प्राणवायू प्रकल्प असलेल्या उत्तम गालवा परिसरात कोटय़वधी रुपये खर्चाचे जंम्बो कोविड रुग्णालय मंजूर केले. मात्र त्यांचे या रुग्णालयाच्या पूर्णत्वाकडे अद्याप लक्ष गेलेले नाही. भाजप आमदाराचे काम म्हणून काँग्रेस राजवटीने दुर्लक्ष करणे असे या आपत्तीच्या प्रसंगी योग्य नसल्याचे मत भाजपनेते व्यक्त करीत आहे.
आ. डॉ. भोयर म्हणाले की, कोविडच्या पाश्र्वभूमीवर हे रुग्णालय त्वरित कामात येणे अपेक्षित आहे. मात्र शासनाने दोन्ही अर्थसंकल्पात तरतूदच केली नाही. म्हणून आपण उर्वरित कामासाठी जिल्हा नियोजन मंडळातून तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.