अहमदनगरचे प्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी किर्तनातून वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ओझर येथे झालेल्या किर्तनात ” सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते ” असे वक्तव्य केलं होते. इंदुरीकर महाराज यांनी केलेले वक्तव्य हे गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात आहे. हे वक्तव्य म्हणजे PCPNDT कायद्यानुसार कलम २२ चे उल्लंघन असल्याचा आरोप या समितीच्या सदस्यांनी केला.
यानुसार PCPNDT च्या सल्लागार समितीने निवृत्ती महाराज इंदुरीकर यांना नोटीस पाठवली आहे. इंदोरीकर महाराजांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी खुलासा मागितला आहे. नोटीस बजावल्यानंतर जर पुरावे आढळले तर गुन्हा दाखल करण्यात येईल असंही PCPNDT च्या सदस्यांनी म्हटलं आहे.
निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी त्यांच्या किर्तनातून अनेकदा सामाजिक, राजकीय क्षेत्रांमधील ज्वलंत विषयावर कीर्तन करुन अनेकांची मनं जिंकली आहेत. मात्र आता गर्भलिंग निदानाबाबत वक्तव्य केल्या प्रकरणी इंदोरीकर यांच्यावर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे.
नेमकं काय म्हणाले इंदुरीकर महाराज?
” सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते ” त्यांच्या या वक्तव्यावरुनच वाद निर्माण झाला आहे.
यानंतर आता त्यांना PCPNDT ने या प्रकरणात नोटीस बजावली आहे. नोटीस बजावल्यानंतर याप्रकरणी त्यांनी स्पष्टीकरण द्यावं असंही PCPNDT ने म्हटलं आहे. इंदुरीकर महाराज हे त्यांच्या किर्तनातून विविध विषयांवर भाष्य करत असतात. त्यांची ही किर्तनं यू ट्युबसह सोशल मीडियावर चांगलीच व्हायरलही होतात. मात्र यावेळी त्यांनी केलेलं वक्तव्य हे त्यांच्या अडचणी वाढवणारं ठरण्याची शक्यता आहे.