सिंहस्थाला सुरुवात होत असताना देशभरातील आखाडय़ांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अखिल भारतीय आखाडा परिषदेच्या अध्यक्षपदाचा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. अनी आखाडय़ांचे ग्यानदास हे केवळ एक साधू आहेत. ते अध्यक्षपदासाठी ज्या न्यायालयीन निकालाचा संदर्भ देतात तो केवळ अलाहाबाद सिंहस्थापुरता मर्यादित होता. त्या कुंभमेळ्यानंतर निवडणूक होऊन परिषदेच्या अध्यक्षपदी आपली निवड झाल्याचा दावा नरेंद्रगिरी महाराज यांनी केला आहे. त्र्यंबकेश्वरमधील साधुग्राम जागा वितरण प्रक्रियेत आखाडा परिषदेने हस्तक्षेप केला नाही; तथापि नाशिक येथे साधुग्राममधील जागावाटपात आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप करत त्यांनी प्रारंभी या प्रक्रियेची जबाबदारी स्वीकारणाऱ्या ग्यानदास महाराजांवर शरसंधान साधले.
शैवपंथीय दहा आखाडय़ांची बैठक रविवारी त्र्यंबकेश्वर येथे पार पडली. या वेळी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह उपस्थित होते. गौण खनिज वाहतूकदारांच्या मध्यंतरी झालेल्या संपामुळे वाळूची टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी, आखाडय़ांची बांधकामे बंद पडल्याची बाब महंतांनी बैठकीत मांडली. पुढील एक ते दोन दिवसांत सर्व आखाडय़ांना आवश्यक तेवढी वाळू उपलब्ध करून देण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचे नरेंद्रगिरी महाराजांनी सांगितले. आखाडा परिषदेचे अध्यक्ष असल्याचे सांगणाऱ्या ग्यानदास महाराजांवर या वेळी नरेंद्रगिरी महाराजांनी टीकास्त्र सोडले. ग्यानदास हे अनी आखाडय़ाचे महंतदेखील नाहीत. परिषदेच्या घटनेनुसार कोणत्याही आखाडय़ाचे श्रीमहंत असणारी व्यक्ती पदाधिकारी म्हणून जबाबदारी स्वीकारू शकते. जे एकाही आखाडय़ाचे महंत नाहीत, ते परिषदेचे अध्यक्ष कसे होऊ शकतात, असा प्रश्न नरेंद्रगिरी महाराजांनी उपस्थित केला. नाशिकमध्ये साधुग्रामचे जागा वितरण हा ग्यानदासांनी धंदा बनविला. तीन वर्षांपासून ते अध्यक्षपद सांभाळतात, तर आजवर त्यांनी सर्व आखाडय़ांची कधी एकत्रित बैठक घेतली नाही. नाशिकमध्ये त्यांच्या सांगण्यावरून वैष्णवपंथीय आखाडय़ांनी पुरोहित संघाच्या ध्वजारोहण सोहळ्यापासून तटस्थ राहण्याची स्वीकारलेली भूमिका चुकीची आहे. वैष्णवपंथीय आखाडय़ातील तीन महंतांवर ग्यानदास हे दबावतंत्राचा अवलंब करत असून लवकरच त्यांच्यावर परिषद कारवाई करणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले.
त्र्यंबकेश्वर देवस्थानने शिव मंदिर आणि कुशावर्त तीर्थाच्या मालकीबाबत केलेल्या वक्तव्यावरून महंतांनी देवस्थानवर टीकास्त्र सोडले. देवस्थानच्या विश्वस्तांनी अतिशय बेजबाबदारपणे विधान केले. देव सर्वाचा असतो. त्याच्यावर कोणी आपली मालकी गाजवू शकत नाही. देवस्थानच्या कार्यशैलीत फरक न पडल्यास शासन व प्रशासन योग्य ती पावले उचलतील, असा विश्वास महंतांनी व्यक्त केला.

 

* आपणच आखाडय़ांचे खरे अध्यक्ष- महंत ग्यानदास
आपणच आखाडा परिषदेचे अध्यक्ष असल्याच्या अलाहाबाद न्यायालयाने दिलेल्या आदेशाची प्रत आपल्याकडे असून पुन्हा तोच तो मुद्दा उगाळत बसण्यात काही अर्थ नाही. शैवपंथीयांची आपणास मान्यता आहे किंवा नाही, याच्याशी आपणास काहीही घेणे नाही, अशी प्रतिक्रिया महंत ग्यानदास महाराज यांनी रविवारी सायंकाळी नाशिक येथील साधुग्राममध्ये आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केली. शैवपंथीयांनी त्र्यंबकेश्वर येथे वैष्णवांना शाही स्नानासाठी येण्याचे आवाहन केल्याच्या मुद्दय़ावर बोलताना महंत ग्यानदास यांनी ते खोटे प्रेम दाखवीत असल्याचा आरोप केला. शिवाय नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील दोन शाही स्नान एकाच दिवशी येत असून तिसऱ्या शाही स्नानासाठी त्र्यंबकेश्वर येथे जाण्याचा विचार करता येईल. नाशिक हेच कुंभमेळ्याचे खरे स्थान असल्याचेही त्यांनी नमूद केले. साध्वींना कुंभमेळ्यात स्वतंत्र जागा तसेच शाही स्नानासाठी स्वतंत्र वेळ देण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी याच वर्षांत आपण बैठक घेणार आहोत. रामकुंडातील काँक्रीटीकरण कमी कालावधीमुळे काढणे शक्य होणार नसल्याने पालकमंत्र्यांनी ती जागा व्यवस्थित करून देण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले असल्याचेही ते म्हणाले.