प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा पुरवण्यास येथील रेल्वेस्थानक प्रशासनाने सुरुवात केली आहे. जिल्ह्य़ातील पारा उन्हाळ्यात ४७ अंशापर्यंत जातो. त्यामुळे प्रवाशांच्या अंगाची लाहीलाही होते. यासाठी ५० लाख रुपयांच्या ‘कुिलग सिस्टीम’ ला मंजुरी मिळाल्यानंतर ही प्रणाली सुरू करण्यात आली आहे. या माध्यमातून ४७ अंशावरील तापमान ३० अंशापर्यंत आणण्यात येणार आहे.
या प्रणालीचे उद्घाटन खासदार नाना पटोले, रेल्वेचे डीआरएम आलोक कंसल यांच्या हस्ते करण्यात आले. गोंदिया रेल्वेस्थानकाची गणना ‘अ’ श्रेणीमध्ये आहे. वर्षांकाठी सहा कोटी रुपयांपर्यंत या स्थानकावरून महसूल मिळतो. मध्यवर्ती आणि महत्त्वाचे स्थानक असल्याचा बहुमानही या स्थानकाला आहे. दिवसाकाठी येथून मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि चंद्रपूरच्या दिशेने आंध्र प्रदेशकडे धावणाऱ्या गाडय़ांतून हजारो प्रवासी जातात. गेल्या दोन वर्षांपासून स्थानकाच्या सौंदर्यीकरणात भर पडली.
फलाटात वाढ करण्यात आली. आता उन्हाळ्यात प्रवाशांचे उष्णतेमुळे हाल होऊ नये म्हणून ५० लाख रुपयांच्या खर्चाची ‘कुिलग सिस्टीम’ सुरू करण्यात आली आहे. यात प्रत्येक फलाटावरील पंख्यांना थंड पाण्याचे पाईप जोडण्यात आले आहे. पंखे सुरू झाल्यानंतर फलाटावर गाडी येण्याच्या अर्धा तास पूर्वीपासून पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे थंड हवा प्रवाशांना फलाट आणि तिकीट घरात मिळणार आहे. त्यासाठी पाणी शुद्धीकरण यंत्रही बसवण्यात आले आहे