महिनाभरात ५९ हजार रुग्णांची नोंद; १,१२९ मृत्यू

महेश बोकडे, लोकसत्ता

नागपूर : राज्यात दुसऱ्या लाटेनंतर आता करोना चांगलाच नियंत्रणात येत असल्याचे चित्र आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमाच्या अहवालानुसार गेल्या महिनाभरात राज्यात ५९ हजार ५० नवीन रुग्णांची नोंद असून १ हजार १२९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे मृत्यूचे प्रमाण १.९१ टक्के आहे.

राज्यात करोनाचा पहिला रुग्ण आढळल्यापासून ३० ऑक्टोबर २०२१ पर्यंत करोनाचे ६६ लाख ९ हजार ९०६ रुग्ण आढळले. पैकी १ लाख ४० हजार १९६ रुग्णांचा मृत्यू झाला. हे मृत्यूचे प्रमाण २.१२ टक्के आहे.

 करोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत राज्यात जास्त रुग्ण आढळले. दरम्यान ३० जुलै २०२१ ते ३० ऑगस्ट २०२१ या एक महिन्याच्या कालावधीत राज्यात करोनाचे १ लाख ६३ ९२४ रुग्ण आढळले. तर ४ हजार ४६३ मृत्यू नोंदवले गेले. हे मृत्यूचे प्रमाण २.७२ टक्के होते. ३० ऑगस्ट ते ३० सप्टेंबर या महिनाभराच्या कालावधीत राज्यात ९० हजार १७६ रुग्ण आढळले. तर १ हजार ८५८ रुग्णांचा मृत्यू झाला. हे मृत्यूचे प्रमाण २.०६ टक्के होते. तर ३० सप्टेंबर ते ३० ऑक्टोबर २०२१ या महिनाभराच्या कालावधीत राज्यात ५९ हजार ५० रुग्णांची नोंद झाली. तर १ हजार १२९ रुग्णांचा मृत्यू झाला. हे मृत्यूचे प्रमाण आणखी कमी म्हणजे १.९१ टक्के नोंदवले गेले. एकीकडे राज्यात दैनिक नवीन करोनाग्रस्तांची संख्या कमी होत असतांनाच दुसरीकडे मृत्यूचे प्रमाणही कमी होत असल्याने आरोग्य विभागाला दिलासा मिळाला आहे.

९७.५७ टक्के व्यक्ती करोनामुक्त

राज्यात मार्च २०२० ते ३० ऑक्टोबर २०२१ पर्यंत करोनाचे ६६ लाख ९ हजार ९०६ रुग्ण आढळले. पैकी उपचारादरम्यान १ लाख ४० हजार १९६ रुग्णांचा मृत्यू झाला. तर यशस्वी उपचाराने ६४ लाख ४९ हजार १८६ व्यक्ती करोनामुक्त झाले. त्यामुळे सध्या राज्यात १६ हजार ९०५ सक्रिय करोनाग्रस्त असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

करोनाची स्थिती

कालावधी                      रुग्ण           मृत्यू          मृत्यूचे प्रमाण

३० सप्टें. ते ३० ऑक्टो.        २१५९,०५०       १,१२९          १.९१ टक्के

३० ऑगस्ट ते ३० सप्टें.        २१ ९०,१७६      १,८५८          २.०६ टक्के

३० जुलै ते ३० ऑगस्ट २१      १,६३,९२४        ४,४६३         २.७२ टक्के