करोना गेल्या दोन वर्षांपासून जगातील सर्व देशांमध्ये कहर माजवत आहे. भारतही यापासून सुटला नाही. जरी आतापर्यंत करोनाच्या प्रकरणांमध्ये किंचित घट झाली असली तरी त्याचा धोका अद्याप टळलेला नाही. जागतिक आरोग्य संघटनेचे आरोग्य तज्ज्ञ वेळोवेळी याबद्दल नवीन माहिती शेअर करत राहतात. दरम्यान, महाराष्ट्रात करोना संसर्गाची दुसरी लाट अद्याप पूर्णपणे ओसरलेली नाही. शिवाय, तिसऱ्या लाटेचा शक्यता देखील वर्तवली जात आहे. अजुनही दररोज नवीन करोनाबाधित आढळून येत असून, करोनाबाधित रूग्णांच्या मृत्यू संख्येतही भर पडतच आहे.

राज्यात दररोज आढळणारी करोनाबाधितांची संख्या ही करोनातून बरे होत असलेल्यांच्या तुलनेत कधी कमी तर कधी जास्त आढळून येत आहे. आज राज्यात करोना बाधित रुग्णांपेक्षा करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. राज्यात आज दिवसभरात ४ हजार ३६४ रूग्ण बरे झाले, तर ३ हजार ७८३ नवीन करोनाबाधित आढळले. याशिवाय, ५२ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू देखील झाला.

राज्यात आज रोजी एकूण ४९ हजार ०३४ बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत एकूण करोनाबाधितांची संख्या ६५,०७,९३० झाली आहे.

करोना नाहीसा होणार नाही, २००९ मधील स्वाइन फ्लूचा विषाणू अजूनही फिरत आहे- WHO

करोना चाचण्यांचं प्रमाण कमी झालं होतं

गेल्या पाच दिवसांमध्ये गणेशोत्सवामुळे राज्यातील करोना चाचण्यांचं प्रमाण कमी झालं होतं. त्यानंतर, आता राज्याच्या आरोग्य विभागाने सर्व जिल्ह्यांना पुन्हा करोना चाचण्यांची संख्या वाढवण्यास सांगितलं आहे. आकडेवारीनुसार, राज्यात दररोज सरासरी २.५ लाख करोना चाचण्या केला जातात. मात्र, १२ सप्टेंबर रोजी हा दैनंदिन चाचण्यांचा आकडा अर्ध्याहून जास्त खाली म्हणजे १.१ लाखांवर घसरला. तर १३ सप्टेंबर रोजी हे प्रमाण वाढून राज्यात साधारणतः १.४ लाखांहून अधिक करोना चाचण्यांची नोंद झाली आहे. याबाबत मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, सणांच्या सुट्ट्या आणि लोकांमध्ये असलेली अनिच्छा यामुळे करोना चाचण्यांची संख्या किंचित कमी झाली आहे.