खरंच देवेंद्र भौ आमचे चुकलेच. आम्ही टाळ्या, थाळ्या वाजवल्या नाहीत. बेडूक उड्या, कोलांट उड्या मारल्या नाहीत. दिवे घालवून दिवे जाळले नाहीत. वारंवार राज्यपाल यांच्याकडे गेलो नाही. देवेंद्र भौ आमचे खरंच चुकले अशा शब्दांत शिवसेना प्रवक्ता मनीषा कायंदे यांनी टोला लगावला आहे. भाजपा आज राज्यभरात आंदोलन करत असून त्याच पार्श्वभूमीवर मनिषा कायंदे यांनी ही टीका केली आहे.

“उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून करोनातून लोकांना वाचवण्यासाठी कठोर झाले. त्यांनी हजारो बेड्सची व्यवस्था केली. कोविड सेंटर्स उघडली, 10 रुपयांची शिवभोजन थाळी 5 रूपयांत तर अनेक ठिकाणी मोफत दिली. रेल्वेने मजुरांना घरपोच पाठवले, पाच लाख मजुरांची तीन वेळच्या जेवणाची व्यवस्था केली, खरंच देवेंद्र भौ आमचे चुकलेच,” असं मनिषा कायंदे यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- “लज्जास्पद”! फोटो ट्विट करुन आदित्य ठाकरेंनी साधला भाजपावर निशाणा

“आम्ही राजकरण करू शकलो नाही देवेंद्र भौ कारण आमचे नेते उद्धव ठाकरे आहेत जे कामातून बोलतात. टाळ्या आणि थाळ्या वाजवून नाचायला आणि दिवे घालवून दिवे जाळायला सांगत नाहीत,” असा टोला मनीषा कायंदे यानी लगावला आहे.

आणखी वाचा- मराठीत कळत नसेल, तर गुजरातीतील एक म्हण यांना योग्य; शिवसेनेकडून भाजपाला उत्तर

“गेले दोन महिने मार्च महिन्याच्या 14 तारखेपासून ते अगदी आजपर्यंत सतत दिवसरात्र महाराष्ट्रातील जनतेची जबाबदारी घेऊन काळजी वाहणारा, त्यांना करोनाच्या मृत्यूच्या जबड्यातून वाचवण्यासाठी दिवसरात्र एक करणारा, जनतेला घरी रहा आणि खबरदारी घ्या मी तुमची जबाबदारी घेतो म्हणणारा अत्यंत धोरणी आणि धडाकेबाज मुख्यमंत्री फ़क्त महाराष्ट्रातील नव्हे देशातील, जगातील जनता अनुभवते आहे. उद्धव ठाकरे यांच्या कर्तुत्वाचे कौतुक तुमच्या केंद्रीय नेत्यांना सुद्धा आहे,” असं मनिषा कायंदे यांनी म्हटलं आहे.