देशात आणि राज्यात करोना लसीकरणाला सुरूवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात कोविड योद्ध्यांना लस दिली जाणार असून, टप्प्याटप्प्यानं सर्व नागरिकांपर्यंत लस पोहोचणार आहे. लसीकरणाला सुरूवात झाल्यानंतर फसवणुकीच्या आव्हानानं डोकं वर काढलं आहे. त्यामुळे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्वतः लोकांना लसी नोदणींच्या भूलथापांना बळी न पडण्याचं आवाहन केलं आहे.

राज्यात करोना लसीकरणाला सुरूवात झाल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करून जनतेला मोलाचा सल्ला दिला आहे. “राज्यात करोना लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. ही मोहीम केंद्रीय यंत्रणेकडून जिल्हा यंत्रणेमार्फत राबविली जात आहे. काही सायबर हल्लेखोर नागरिकांना फोन करून या लसीची नोंदणी करण्यासाठी मोबाईलवर आलेला ओटीपी, आधार क्रमांक, पिन कोड व इतर वैयक्तिक माहिती विचारत आहेत,” अशी माहिती देशमुख यांनी दिली.

“अशा प्रकारच्या भूलथापांना नागरिकांनी बळी पडू नये, तसेच आपली कोणतीही माहिती सामायिक करू नये, असे मी आवाहन करतो. तसेच या फोन कॉल्सची नजिकच्या पोलीस स्टेशनमध्ये आणि महाराष्ट्र सायबर विभागात तक्रार करावी. जेणेकरून पोलीस या सायबर हल्लेखोरांवर नियमांनुसार कठोर कायदेशीर कारवाई करतील,” असं आवाहनही देशमुख यांनी केलं आहे.

लसीकरणाच्या शुभारंभ प्रसंगी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आशावाद

करोना लसीकरणाचा देशपातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, तर राज्यपातळीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते आज शुभारंभ झाला. मुंबई महापालिकेच्या वांद्रे-कुर्ला संकुलामधील कोविड सुविधा केंद्रात लसीकरणाची सुरूवात झाली. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, “ते दिवस आठवल्यानंतर आजही अंगावरती शहारे येतात. दिवसरात्र एकच चिंता होती. तणाव होता. काही हाताशी नसताना पुढे कसं जायचं? हा एक मोठा प्रश्न होता. पण त्या सर्व संकटाच्या काळात ही सर्व लोकं जर आमच्या सोबत नसती, तर आजचं कोविड सेंटर हे अशाप्रकारे पाहायला मिळालं नसतं. हे कोविड सेंटर लसीकरण केंद्राच्या रुपातच पाहायला मिळो असं मला वाटतं,” असा आशावाद मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.