scorecardresearch

मनपाच्या कचरा डेपोला बुरूडगाव ग्रामपंचायतीकडून कुलूप; शहराची कचराकोंडी; घंटागाडय़ा जागेवर उभ्या

महापालिकेने बुरुडगाव ग्रामपंचायतीला दिलेल्या लेखी आश्वासनांची पूर्तता न केल्याचा आक्षेप घेत ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांनी कचरा डेपोला कुलूप ठोकून मनपाच्या कचरा घेऊन येणाऱ्या वाहनांना विरोध केला.

महापालिकेने बुरुडगाव ग्रामपंचायतीला दिलेले आश्वासन पूर्ण न केल्याबद्दल ग्रामपंचायतीने कचरा डेपोला मंगळवारी कुलूप ठोकले.

नगर : महापालिकेने बुरुडगाव ग्रामपंचायतीला दिलेल्या लेखी आश्वासनांची पूर्तता न केल्याचा आक्षेप घेत ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांनी कचरा डेपोला कुलूप ठोकून मनपाच्या कचरा घेऊन येणाऱ्या वाहनांना विरोध केला. त्यामुळे महापालिकेची कचरा संकलित करणारी सर्व वाहने आता तुडुंब भरल्याने जागेवरच उभी राहिली आहेत. आज, मंगळवारी दिवसभर मनपा व बुरूडगाव ग्रामपंचायत सदस्यांमधील चर्चा असफल ठरली. आता उद्या, बुधवारी चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र ही चर्चा महापालिकेत होणार की बुरूडगाव ग्रामपंचायतीत याबद्दल मतभेद आहेत.

मनपाने शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी बुरूडगाव ग्रामपंचायत हद्दीतील भूखंडावर प्रकल्प उभा केला आहे. त्या बदल्यात बुरुडगावला नळाद्वारे पाणीपुरवठा केला जाईल, कचरा डेपोकडे जाणारा नवीन रस्ता तयार करून तेथे पथदिवे व वृक्षारोपण केले जाईल, असे आश्वासन मनपाने ग्रामपंचायतला दिले आहे. वारंवार मागणी करून, लक्ष वेधूननही मनपा त्याची दखल घेत नाही, असा बुरूडगाव ग्रामपंचायतीचा आक्षेप आहे. 

याशिवाय सावेडी कचरा डेपो मनपाने बंद करून तो बुरूडगावला आणला आहे. त्यामुळे बुरुडगावला रोज सुमारे २०० मेट्रिक टन कचरा संकलित होतो. मनपाने केवळ १०० मेट्रिक टन प्रकल्प उभा केला आहे. त्यामुळे उर्वरित कचरा टाकण्यासाठीही ग्रामपंचायतीने  विरोध केला आहे.  बुरुडगाव ग्रामपंचायतीने २२ मार्चला ग्रामपंचायतीने पुन्हा पत्र देऊन ५ मार्चला कचरा डेपोला कुलूप ठोकण्याचा इशारा देणारे पत्र मनपा आयुक्तांना दिले. मात्र, उपाययोजना न झाल्याने डेपोला कुलूप ठोकण्यात आल्याचे सरपंच बापू कुलट, उपसरपंच शिराज शेख, सदस्य महेश निमसे यांनी सांगितले. यावेळी अक्षय चव्हाण, विजय कदम, संजय फुलारे, राधाकिसन कुलट, संभाजी जाधव, पांडुरंग जाधव, राजेंद्र क्षेत्रे आदी उपस्थित होते.

काल रात्री मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख डॉ. शंकर शेडाळे यांनी ग्रामपंचायतीला पत्र देऊन आंदोलन न करण्याबद्दल आवाहन केले. मात्र, बुरुडगाववासीय आंदोलनावर ठाम होते. आज सकाळी अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे यांनी बुरुडगावमध्ये जाऊन सदस्यांशी चर्चा केली. मात्र तोडगा निघाला नाही. आता उद्या सकाळी मनपा आयुक्त व ग्रामपंचायत सदस्यांमध्ये चर्चा होणार आहे.

आज शहरातील कचरा गोळा होणार नाही?

बुरुडगाव ग्रामपंचायतीने कचरा डेपोला सकाळी दहाच्या सुमारास कुलूप ठोकले. त्यामुळे ६२ घंटागाडय़ा, ७ कॉम्पॅक्टर तेथे पोहोचले. मात्र ती जागेवरच उभी राहिली. रस्त्यावरील खड्डय़ांमुळे एक कॉम्पॅक्टर तेथेच उलटला. कचरा संकलित करणारी सर्व वाहने तुडुंब भरल्याने उद्या, बुधवारी शहरातील कचरा संकलन होईल की नाही याबद्दल साशंकता व्यक्त केली जात आहे. 

राष्ट्रीय हरित लवादाकडे दाद

बुरुडगाव कचरा डेपोत महापालिकेने नियमानुसार प्रकल्प उभे न करता विल्हेवाट लावली जाते, असा आक्षेप घेत बुरुडगावचे राधाकिसन कुलट यांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे दाद मागितली आहे. गेली १७ वर्षे यासाठी ते लढा देत आहेत. त्यातील काही प्रकल्प मनपाने पूर्ण केले, तर काही प्रकल्प अपूर्णच आहेत. प्रकल्प नियमानुसार व वेळेत पूर्ण केल्याबद्दल लवादाने मनपाला दंड ठोठावला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Corporation waste depot locked city garbage bells stand spot ysh

ताज्या बातम्या