वीज मीटर बदलण्यासाठी १० हजारांची लाच स्वीकारताना जेरबंद झालेला महावितरणच्या बागलाण तालुक्यातील लखमापूर येथील कर्मचारी बंडू रामचंद्र गोसावी याला येथील अपर सत्र न्यायालयाने दोन वर्षे सक्तमजुरी व चार हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
लखमापूर येथील एका वीज ग्राहकाचे मीटर खराब झाल्याने त्याने वीज कर्मचारी गोसावी यांच्याकडे तगादा लावला होता. मात्र गोसावी त्यास टाळाटाळ करीत होता. मीटर बदलण्यासाठी गोसावीने पैशांची मागणी केली. याविरोधात संबंधित ग्राहकाने नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार १७ सप्टेंबर २००७ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने रचलेल्या सापळ्यात गोसावी अडकला. त्याला रंगेहाथ पकडण्यात आले होते. या प्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या खटल्याची सुनावणी तेथील अप्पर सत्र न्यायालयात झाली. सरकारी पक्षातर्फे चार साक्षीदार तपासण्यात आले. गुन्हा शाबीत झाल्याने गोसावीला दोन वर्षे सक्तमजुरी व चार हजारांची शिक्षा ठोठावण्यात आली. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. बळवंतराव शेवाळे यांनी काम पाहिले.