लोणावळा : पुणे- मुंबई लोहमार्गावर खंडाळा घाटात नागनाथ ते पळसदरी दरम्यान पहाटे दरड कोसळली. त्यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. लोहमार्गावर पडलेली दरड काढण्यात आल्यानंतर सकाळी दहाच्या सुमारास रेल्वे वाहतूक सुरळीत होऊ शकली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खंडाळा घाटात नागनाथ ते पळसदरी दरम्यान शुक्रवारी पहाटेच्या सुमारास दरड कोसळली. त्यामुळे पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे गाडय़ा खंडाळा, लोणावळा रेल्वे स्थानकांवर थांबविण्यात आल्या. मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या रेल्वे गाडय़ा कर्जत रेल्वे स्थानकात थांबविण्यात आल्या. दरड कोसळल्याची माहिती मिळाल्यानंतर रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी तसेच यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. तातडीने दरड हटविण्याचे काम सुरू करण्यात आले. दरड कोसळल्याने पुण्याहून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक काही काळ थांबली. दरड काढण्याचे काम करतानाच मध्यवर्ती मार्गिकेवरून काही गाडय़ा पुढे रवाना करण्यात आल्या. सकाळी दहाच्या सुमारास लोहमार्गावर पडलेली दरड पूर्णपणे हटविल्यानंतनर रेल्वे वाहतूक सुरळीत झाली.

दरडीच्या घटनेमुळे लांब पल्ल्याच्या नऊ ते दहा गाडय़ांना विलंब झाला. विशाखापट्टनम-कुर्ला, हैदराबाद-मुंबई, गदग-मुंबई, पाँडेचरी-मुंबई, सोलापूर-मुंबई, कोल्हापूर-मुंबई, दादर-शिर्डी, मुंबई-सोलापूर, मुंबई-चेन्नई आदी गाडय़ांचा त्यात समावेश होता.

दरडींच्या घटना दरवर्षीच

पुणे-मुंबई लोहमार्गावरील खंडाळा-लोणावळा घाट विभागामध्ये पावसाळय़ात दरवर्षी दरडी कोसळण्याच्या घटना घडतात. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम होतो. बोरघाटामध्ये सातत्याने होणाऱ्या घटना लक्षात घेता या टप्प्यामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या टप्प्यात दरडींच्या घटनांना मोठय़ा प्रमाणावर आळा बसला असला, तरी इतर भागातही ही समस्या निर्माण होते हे शुक्रवारच्या घटनेमुळे स्पष्ट झाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crack fell railway khandala ghat railway traffic disrupted ysh
First published on: 13-08-2022 at 00:02 IST