गावे ही भविष्यकालीन शहरे असे समजूनच ग्रामविकासाचा आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी दिल्या. गावाच्या गरजा लक्षात घेऊन त्यानुसार सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असे ते म्हणाले.
जिल्हा नियोजन समिती अंतर्गत लहान गटाची बैठक बुधवारी कवडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत ते बोलत होते. आमदार बाळासाहेब मुरकुटे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद जगताप, सदस्य सुरेखा कदम, सुरेखा राजेभोसले, जिल्हा नियोजन अधिकारी शिरीष वरसाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. एम सोनवणे या बैठकीला उपस्थित होते.
कवडे म्हणाले, राज्यात शहरीकरणाचे प्रमाण झपाटय़ाने वाढते आहे. त्यामुळे ग्रामीण भागाचा कायापालट होत असून गावांचा विस्तारही झपाटय़ाने होत आहे. ग्रामीण विकासाचा आराखडा तयार करताना या गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. घनकचरा, सांडपाणी, पाण्याची बचत व फेरवापर या गोष्टींना या आराखडय़ात प्राधान्य दिले पाहिजे. ज्या गावांमध्ये सौरदिवे बसवले, त्या गावात पथदिव्यांच्या वीजबिलात किती बचत झाली याचाही हिशोब निश्चितपणे मांडता आला पाहिजे. विकासाच्या या गोष्टी करत असतानाच अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायदा (अ‍ॅट्रॉसिटी), स्त्रीभ्रूणहत्याविरोधी कायदा यावर जनजागृती करणे गरजेचे असून त्याकडेही लक्ष देण्याचे आवाहन कवडे यांनी केले.
जिल्हा नियोजन समितीच्या वार्षिक योजनेंतर्गत डिसेंबरअखेरीपर्यंत जिल्ह्य़ात झालेल्या खर्चाचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. तसेच येत्या आर्थिक वर्षातील (२०१५-१६) योजनांच्या प्रारूप आराखडय़ावरही बैठकीत चर्चा झाली.