येवल्यातील मेळाव्यात उद्धव ठाकरे यांची ग्वाही

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शेतकरी संपादरम्यान आंदोलकांविरुद्ध गुन्हेगारी स्वरूपाची कलमे लावून कारवाई करण्यात आली. हे गुन्हे मागे घेण्यास आम्ही भाग पाडणार असून त्याशिवाय गप्प बसणार नाही. गुन्हे मागे न घेतल्यास शिवसेना आहे आणि सरकार आहे, असा इशारा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला.

रविवारी ठाकरे यांनी निफाड आणि येवला तालुक्यातील शेतकऱ्यांची भेट घेत त्यांचे म्हणणे जाणून घेतले. येवला येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधतांना फडणवीस सरकारचा खरपूस समाचार घेतला. भरवस येथील काही शेतकऱ्यांनी संपादरम्यान करण्यात आलेल्या आंदोलनामुळे त्यांच्याविरुद्ध लावण्यात आलेल्या कलमांची माहिती देत गळ्यात कलम लिहिलेल्या पाटय़ा अडकविल्या होत्या. त्यावेळी ठाकरे यांनी पिंपळगावसह अन्य भागात झालेल्या शेतकरी आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याचे आवाहन केले. शेतकऱ्यांना जर गुन्हेगार ठरवणार असाल तर, या गुन्हेगारांबरोबरच सेना आहे. गुन्हे मागे न घेतल्यास दणका दाखवू असे ठणकावले. पिंपळगाव येथील आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या शेतकऱ्यांची यादीच सभेत ठाकरे यांनी मागवली. ही यादी सरकारकडून रद्द करून घेणारच, असा दिलासाही त्यांनी दिला.

कर्जमाफीसाठी शिवसेनेकडून सातत्याने केलेला पाठपुरावा, येवल्यासह नाशिक जिल्ह्य़ात पडलेली आंदोलनाची ठिणगी, यामुळे सरकारला जाग आल्याने कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय झाला. मराठवाडा आणि विदर्भात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण अधिक असल्याने कर्जमाफीमुळे आत्महत्यांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, परंतु आंदोलनाची ठिणगी पडलेल्या भागात मात्र काहीच फायदा झालेला नाही. यामुळे परिसरात असंतोष असल्याची जाणीव आहे. त्यामुळेच आपल्या भेटीला आलो असल्याचे ठाकरे यांनी नमूद केले. शेतकऱ्यांच्या व्यथेकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यायला हवे. कर्जमाफीपासून वंचित शेतकऱ्यांनाही न्याय मिळण्याची गरज आहे. हे काम सरकारकडून शिवसेना करून घेणारच, असे आश्वासनही त्यांनी दिले. शहरीबाबू म्हणून आमच्यावर टीका झाली. सेना सत्तेत आहे की बाहेर, असा उपरोधही झाला. ते काहीही असू द्या, सेनेने कर्जमाफी करवून घेतली. सरकारने जून २०१६ पर्यंतच्या कर्जाबाबत निर्णय घेतला असला तरी जून २०१७ अखेरच्या कर्जमाफीचा निर्णय घेण्यास भाग पाडण्यात येईल हा शिवसेनेचा शब्द आहे. कांदा पिकासह अन्य शेतमालाला हमी भाव देण्यासाठी स्वामिनाथन आयोग लागू करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळेच राष्ट्रपती पदासाठी सेनेने स्वामिनाथन यांचे नाव सुचविले होते, परंतु स्वामिनाथन यांचे प्रकृती स्वास्थ्य, आणि थकवा अशी करणे सांगण्यात आली. काहीही असले तरी स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करावीच लागेल. दुष्काळाने जर्जर झालेला शेतकरी गारपिटीत सापडला. त्यानंतर मोदींच्या नोटाबंदीच्या फंडय़ात शेतकऱ्यांची रोकड थांबली. शेतकरी अडचणीत आला. शिवाय जिल्हा बँकेत राजकारण आणून अध्यक्ष नरेंद्र दराडे यांना बदनाम केले गेले. चुका झाल्या असतील तर पकडण्याची हिंमत दाखवा. जिल्हा बँकेत पडून राहिलेल्या पैशाचे व्याज कोण देणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. प्रास्ताविक जिल्हा बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांनी केले. व्यासपीठावर पर्यावरण मंत्री रामदास कदम, सहकार राज्यमंत्री दादा भुसे, खा. हेमंत गोडसे, आ. अनिल कदम, सुनील शिंदे, माजी आमदार मारोतराव पवार, जिल्हा बँक अध्यक्ष नरेंद्र दराडे, संभाजीराजे पवार, यांचेसह शिवसेना नेते उपस्थित होते. पिंपळगाव जलाल येथेही ठाकरे यांच्या उपस्थितीत सभा झाली. यावेळी शेतकरी संपादरम्यान झालेल्या आंदोलनात मृत्यू झालेल्या शंकर मोरे या शेतकऱ्याच्या पत्नीला येवला पंचायत समिती उपसभापती रुपचंद भागवत यांनी एक लाखाच्या केलेल्या मदतीचा धनादेश पिंपळगाव जलाल येथील सभेत उद्धव ठाकरे यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी शिवसेना नेते संभाजीराजे पवार, उपजिल्हा प्रमुख वाल्मिक गोरे, तालुका प्रमुख झुंजार देशमुख, शहर प्रमुख राजेंद्र लोणारी आदी उपस्थित होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Criminal offenses on farmers uddhav thackeray shiv sena
First published on: 26-06-2017 at 02:21 IST