स्वत:च्या पत्नीला विवाहानंतर तीन महिन्यांत वाऱ्यावर सोडून दिले, त्यानंतर अनेक निवडणुकांमध्ये उमेदवारी अर्जात पत्नीचा कॉलम कोरा ठेवला. यावेळी मात्र पत्नी असल्याचा उल्लेख केला, ही देशाची फसवणूक तर आहेच. शिवाय स्त्रीचा अवमानही आहे. जो पत्नीला संभाळू शकत नाही, तो देश काय संभाळणार अशी प्रखर टीका गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी राशिन येथील प्रचार सभेत रविवारी बोलताना केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजीव राजळे यांच्या प्रचारासाठी गृहमंत्री पाटील यांची राशिन येथे सभा झाली. यावेळी पालकमंत्री मधुकर पिचड, आ. बबनराव पाचपुते, जिल्हा परिषद सदस्य राजेद्र फाळके, परमवीर पाडुळे, प्रवीण घुले, सुरेखा राजेभोसले, बाबासाहेब जगदाळे, सभापती सोनाली बोराटे, उपसभापती किरण पाटील, राजेद्र देशमुख, राजेद्र गुंड, अंबादास पिसाळ आदी उपस्थित होते.
यंदाची लोकसभेची निवडणूक वेगळी आहे. देश एकसंघ ठेवणारांच्या हाती सत्ता की विभाजन करणारांच्या हाती देणार हे ठरवणारी निवडणूक आहे. देश म. गांधी की नथुराम गोडसेच्या ताब्यात द्यायचा याचा विचार करण्याची वेळ आली असल्याचा उल्लेख त्यांनी केला. पाटील यांनी भारिपचे खा. रामदास आठवले यांच्यावरही जोरदार टीका केली. राष्ट्रवादीने त्यांना माढा व पंढरपूर येथे खासदार केले, मात्र केवळ आडनाव असूनही ‘आठवले’ ते विसरले, शिवसेनेचा मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरास विरोध होता हेही ते विसरले. नागपुरच्या चैत्यभूमीऐवजी रेशीमबागेत ते नतमस्तक झाले असे ते म्हणाले.
मंत्री पिचड, आ. पाचपुते, फाळके, संभाजीराजे भोसले आदींची भाषणे झाली. प्रास्तविक राजेंद्र देशमुख यांनी केले. आभार नानासाहेब निकत यांनी मानले तर सूत्रसंचालन निलेश दिवटे यांनी केले.
संग्रहित लेख, दिनांक 13th Apr 2014 रोजी प्रकाशित
पत्नीला सांभाळत नाही, तो देश कसा संभाळणार?
स्वत:च्या पत्नीला विवाहानंतर तीन महिन्यांत वाऱ्यावर सोडून दिले, त्यानंतर अनेक निवडणुकांमध्ये उमेदवारी अर्जात पत्नीचा कॉलम कोरा ठेवला. यावेळी मात्र पत्नी असल्याचा उल्लेख केला, ही देशाची फसवणूक तर आहेच.
First published on: 13-04-2014 at 03:49 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Criticism on narendra modi by r r patil