जिल्ह्य़ात लस उपलब्ध होताच केंद्रावर गर्दी आणि गोंधळ

पालघर : पालघर जिल्ह्यत ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी तसेच १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी काही दिवसांच्या प्रतीक्षेनंतर गुरुवारी लस उपलब्ध झाल्याने अनेक लसीकरण  केंद्रांवर गर्दी व गोंधळाचे वातावरण दिसून आले. त्यावर उपाय म्हणून प्रशासनातर्फे नोंदणी झालेल्या नागरिकांना टोकन देऊन लस देण्याचे नियोजन करण्यात आले.

लस उपलब्ध नसल्याने जिल्ह्य़ात ४५ वर्षांवरील वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण काही दिवसांपासून बंद होते. जिल्ह्यला २० हजार लशींचा पुरवठा प्राप्त झाल्याने गुरुवारपासून पुढील दोन दिवस लस उपलब्ध होणार असल्याचे संदेश समाजमाध्यमांवर प्रसिद्ध झाल्याने लसीकरण केंद्रावर सकाळपासून एकच गर्दी झाली. पालघर नगर परिषदेने सुरू केलेल्या आठ लसीकरण केंद्रावर  सकाळपासून गर्दी झाल्याने ३०० नागरिकांना प्राधान्याने टोकन देण्यात आले व गर्दी टाळण्यासाठी दुपारनंतर लसीकरण प्रत्यक्षात सुरू करण्यात आले.

१८ ते ४४ वयोगटातील स्थानिक नागरिकांना लस देण्यासाठी आणि बाहेरगावाहून लोकांचा आवक रोखण्यासाठी लसीकरणाची ऑनलाइन नोंदणीनंतर लागलीच केंद्रांवर टोकन वितरित करण्यात आले. या वेळी आधार कार्ड तपासून टोकन दिले जात असल्याने बाहेरगावाहून लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांना आळा बसला.

पालघर नगर परिषद लसीकरणाच्या ठिकाणी नेमण्यात आलेल्या परिचारिकांना लसीकरण बंद असताना करोना आरोग्य केंद्रांमध्ये तसेच करोना काळजी केंद्रामध्ये कार्यरत ठेवण्याबाबत संभ्रम झाल्याने काही काळ नगरपरिषद अधिकारी व परिचारिकांमध्ये वाद निर्माण झाला होता. त्यामुळे लसीकरण खोळंबून राहिले होते. परिचारिकांना संसर्गाच्या भीती असल्यामुळे  करोना काळजी केंद्र व उपचार केंद्रांमध्ये लसीकरण कार्यरत ठेवण्यात येणार नाही, असे आश्वासन दिल्यानंतर हा वाद मिटला, असे नगराध्यक्ष डॉ. उज्ज्वला काळे यांनी सांगितले.

पालघर शहरात आठ केंद्रांवर प्रत्येकी ३०० नागरिकांचे लसीकरण येत्या दोन दिवस आयोजित केले जात असल्याचे व या कामी नगर परिषदेने मनुष्यबळ पुरवठा केल्याची माहिती त्यांनी दिली.

कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिनही उपलब्ध

पालघर जिल्ह्यत कोव्हिशिल्डसोबत कोव्हॅक्सिन लशींचा मुबलक साठा उपलब्ध झाला आहे. जिल्ह्यत ठिकठिकाणी दोन्ही लशींचे लसीकरण १८ ते ४४ वयोगटातील नव्याने उभारण्यात येणाऱ्या केंद्रांमध्ये सुरू करण्यात येणार आहे. ४५ वर्षांवरील वयोगटातील नागरिकांसाठी पूर्वी सुरू असलेली केंद्रांमधून लसीकरण सुरू राहणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या लसीकरण विभागाकडून सांगण्यात आले.

नालासोपाऱ्यात संताप

नालासोपारा पश्चिमेच्या उमराळे येथील लसीकरण केंद्रात गुरुवारी  ४५ वर्षांवरील नागरिकांना  लस देण्यात येत होती. त्यासाठी लोकांनी रात्री १२ पासून रांगा लावल्या होत्या. मात्र पहिल्या १०० जणांना टोकन देण्यात आले. उर्वरित लोकांना दुसऱ्या दिवशी टोकनवर लस मिळेल असे वाटले होते. मात्र त्यांना हे टोकन दुसऱ्या दिवशी चालणार नाही, असे सांगण्यात आले.  आता आम्ही दररोज रात्रीपासून रांगा लावायच्या का असा सवाल अशोक म्हात्रे यांनी केला. स्थानिक नगरसेवक ओळखीच्या लोकांना लस मिळवून देतात त्यामुळे रांगा लावणाऱ्यांना ताटकळत उभे राहावे लागते, असे राजन नाईक यांनी सांगितले.  गोंधळ वाढल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्यांनी  जमावाला नियंत्रित केले. या ठिकाणी कुठलेही नियोजन नाही असा आरोप स्थानिक रहिवासी भूपेश पाटील यांनी केला.