साताऱ्यात जमिनीचे गैरव्यवहार, ६ जणांविरुद्ध गुन्हा
शासनाचे संकेतस्थळ ‘हॅक’ करून तेटली (ता. जावली) येथील अस्तित्वात नसलेल्या सव्र्हे नंबरचा बनावट ‘ऑनलाईन सात-बारा’ तयार करून त्यानुसार खरेदीदस्त करण्याची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये शासनाची सुमारे ५९ गुंठे जागा स्वत:च्या नावावर करण्यात आली आहे. याप्रकरणी मेढा पोलिस ठाण्यात अज्ञात ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. यामध्ये मोठ्या बांधकाम व्यावसायिकांचा समावेश असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाकडे सोपवला आहे.
तेटली (ता. जावली) येथे १०२ व ३२ क/४ हे दोन सव्र्हे नंबर अस्तित्वात नसताना ‘ऑनलाईन’ सात-बारा तयार करण्यात आला. यानुसार शासनाची ५९ गुंठे जमीन स्वत:च्या नावावर करून घेण्यात आली आहे. यामध्ये शासनाचे सुमारे ९ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. महसूल विभागाचे संकेतस्थळ ‘हॅक’ करून हा ‘ऑनलाईन’ ‘सात-बारा’ तयार करण्यात आला आहे. हा ‘सात-बारा उतारा’ तयार करून या अज्ञातांची सुमारे दीड एकर जमीन स्वताच्या नावावर करून घेतली आहे. हा बनावट ‘सात-बारा उतारा’ करण्यासाठी महसूल विभागातील अधिकाऱ्यांनीच त्यांना मदत केली असल्याचे समोर येत आहे.
संबंधितांनी बोगस ‘ऑनलाईन’ सात-बारा अस्तित्वात आणल्यानंतर त्याचे दस्त बनवले. ते दस्त नोंदणीसाठी आले असता तलाठी, तहसीलदारांच्या लक्षात ही गोष्ट आली. यानंतर मेढा पोलिसांत याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणामध्ये एक बांधकाम व्यावसायिकासह केळघर, मेढा व सदापूर येथील काहींचा सहभाग आहे. या टोळीने महाबळेश्वर, कास, बामणोली तापोळा या भागात असे अजून घोटाळे केले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शासनाचे संकेतस्थळ ‘हॅक’ करून ‘ऑनलाईन’ बनावट सातबारा तयार करणे व त्याचा खरेदी दस्त करणे या प्रक्रियेमध्ये महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचेही हात ओले झाले असल्याची चर्चा आहे.
तापोळा, बामणोली, तेटली ही ठिकाणे पर्यटकांसाठी ‘हॉट डेस्टिनेशन’ आहेत. महाबळेश्वर, पाचगणीप्रमाणेच या ठिकाणी जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत. मुंबई-पुण्यातील अनेक गर्भश्रीमंत व उच्च मध्यमवर्गीय लोकांनी याठिकाणी मोठ्या प्रमाणावर जागा खरेदी केल्या आहेत. या जागांच्या व्यवहारातून कोट्यवधी रुपये मिळत असल्याने येथे जमिनीचे दलाल निर्माण झाले आहे. त्यांच्या माध्यमातूनच बोगस दस्तावेज तयार करून जमिनी विकल्याचे समोर येत आहे.
पोलिसांनी तपास करावा
जमिनीचा जो गटच अस्तित्वात नाही, त्याचा ‘सात बारा’ची ‘ऑनलाईन’ अथवा हस्तलिखित नोंद नाही. अशा खोट्या नोंदीचा संगणकीय बदल करून ‘सात बारा’ तयार करून खरेदी दस्ताचा व्यवहार झालेला आहे. ही बाब लक्षात येताच पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे करणारे कोण आहेत, यातून कोणाचा फायदा होणार होता, याकामी कोणी सहकार्य केले याचा पुढील तपास पोलिसांनी करायचा आहे. – रोहिणी आखाडे, तहसीलदार, मेढा