काँग्रेसच्या विभागीय वचनपूर्ती मेळाव्यात आज राष्ट्रवादी काँग्रेसला प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी टार्गेट केले. त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चिमटा घेत काँग्रेसच राज्यातील सर्वात मोठा पक्ष असल्याची जाणीव करून दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप, सेना व मनसेसोबतचा घरोबा संपवावा, असा सल्ला माणिकराव ठाकरे यांनी येथे दिला. या मेळाव्यास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश आदींची प्रमुख उपस्थिती होती.
काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याची गरज असून लोकसभा व विधानसभेची जागा कुणाकडे आहे म्हणून ती सोडणार नाही, अशी भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी घेतली. यापूर्वी मुख्यमंत्री आमचा झाला असता, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. या वक्तव्याचा समाचार माणिकराव ठाकरे यांनी येथे घेतला. त्यांनी, गेल्या वेळी काँग्रेस आघाडीसोबत कम्युनिस्ट पक्ष होता, त्यामुळे काँग्रेसकडे एकूण ७२ जागा होत्या, असा दावा केला. त्याचवेळी राष्ट्रवादीकडे ७१ जागा होत्या, अशी माहिती ठाकरे यांनी दिली. खरे मुख्यमंत्रीपद मिळण्यासाठी संख्या जुळवावी लागते. त्यासाठी नुसते तोंडाने बोलून होत नसल्याचा सल्ला माणिकराव ठाकरे यांनी पवारांना दिला. राष्ट्रवादीने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मनसे, भाजप व शिवसेनेला विविध ठिकाणी दिलेला पाठिंबा काढून कृतीने विरोध दर्शवावा, असेही माणिकराव ठाकरे म्हणाले. यावेळी माणिकराव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे नौटंकी करत असून शिवराळ भाषेने मत मिळत नसल्याची टीका केली.
आज राष्ट्रवादीत असलेल्यांनी १९७७ ला काँग्रेसमध्ये फूट पाडली. १९७८ मध्ये विदर्भात ६६ पैकी ६४ जागांवर काँग्रेस विजयी झाली होती, असा दावा काँग्रेस नेते शिवाजीराव मोघे यांनी केला. काँग्रेसने विधानसभा व लोकसभेत स्वतंत्र निवडणूक लढविण्याची गरज शिवाजीराव मोघे यांनी केली, तसेच त्यांनी आरपीआय, कम्युनिस्ट व शेकापसोबत आघाडी करण्याचा सल्ला दिला, तर या मेळाव्यात बोलताना राजेंद्र दर्डा यांनी काँग्रेस उमेदवाराच्या पराभवासाठी काँग्रेसमधील लोक जबाबदार असल्याची टीका केली.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाने घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती दिली. त्यांनी विदर्भातील कापसावर विदर्भात प्रक्रिया करण्याची गरज व्यक्त केली. खारपाणपट्टय़ासाठी विशेष निधी देण्यात येईल, असेही सूतोवाच त्यांनी केले. या मेळाव्यात समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ.सुधीर ढोणे, भारिप-बमसंचे मधुकर पवार, जमील कुरेशी यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या मेळाव्यात नितीन राऊत, मुजफ्फर हुसेन, बटर्रेंड मुल्लर, गणेश पाटील, यशोमती ठाकूर, झिया पटेल, अनिस अहमद, डॉ.सुभाष कोरपे, हरिभाऊ राठोड, अनंतराव देशमुख, विजय देशमुख, बाबाराव विखे पाटील, मदन भरगड, सुरेश पाटील, रफिक सिद्दीकी, राजेश भारती, कपिल रावदेव आदींची उपस्थिती होती.
उचलली जीभ..
या मेळाव्यात भाषण करताना अनेकांनी वादग्रस्त वक्तव्ये केली. नितीन राऊत यांना भाषण आवरण्याचा सल्ला देणाऱ्या सुधाकर गणगणे यांना राऊतांनी घडय़ाळ दाखवू नका, असे ठणकावले. मुख्यमंत्र्यांनी इतर राजकीय पक्षांना बारके पक्ष म्हणून हिणवले, तर पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यातील राजीव गांधी आरोग्य योजना संपूर्ण देशात राबवू, असे सांगून टाकले. काँग्रेस पक्ष हा प्रश्न असल्याचे ते भाषणाच्या ओघात म्हणाले, तर सर्वात मोठी चूक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश यांनी भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी नागपूरचे काँग्रेसचे अध्यक्ष असल्याची नवी माहिती सभेत दिली, तसेच गडकरी हे मोदींसोबत पंतप्रधानांच्या रेसमध्ये होते असा खुलासा केला; तर शिवाजीराव मोघे यांनी १९७७ च्या फुटीचा उल्लेख करताना शरद हे नाव घेत शब्दांना थांबविले.