महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतिपदी अपेक्षेप्रमाणे सत्ताधारी गटाला पाठिंबा दिलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक किशोर डागवाले विजयी झाले. शिवसेना अपक्ष आघाडीचे सचिन जाधव यांचा त्यांनी ४ मतांनी पराभव केला. महिला-बालकल्याण समितीच्या सभापतिपदी नसीम शेख खानसाहेब यांची, तर उपसभापतिपदी कलावती शेळके यांच्या बिनविरोध निवडीची औपचारिक घोषणाही जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी मंगळवारी केली.
या तीन पदांसाठी दोन्ही समित्यांच्या सदस्यांची सभा मंगळवारी बोलवण्यात आली होती. जिल्हाधिकारी कवडे यांनी या वेळी पीठासन अधिकारी म्हणून काम पाहिले. या तिन्ही पदांसाठी सोमवापर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्यात आले होते. महिला-बालकल्याण समितीच्या निवडी बिनविरोध होणार हे त्याच वेळी स्पष्ट झाले होते. विरोधकांनी उमेदवारी अर्जच दाखल न केल्याने सभापतिपदासाठी शेख (अपक्ष) व उपसभापतिपदासाठी शेळके असे दोघींचेच अर्ज रिंगणात होते. त्यांच्या बिनविरोध निवडीची औपचारिकता मंगळवारी पूर्ण करण्यात आली.
स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी सत्ताधारी गटातर्फे मनसेचे किशोर डागवाले व शिवसेना अपक्ष आघाडीच्या वतीने अपक्ष नगरसेवक सचिन जाधव यांच्यात निवडणूक झाली. समितीतील संख्याबळानुसार डागवाले यांना १० व जाधव यांना ६ मते पडली. ४ मतांनी डागवाले विजयी झाले. निवडीनंतर मनसे समर्थकांनी जल्लोष केला. पक्षाचे मनपातील गटनेते गणेश भोसले, नगरसेवक कैलास गिरवले आदी या वेळी उपस्थित होते.