औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या ९ ऑगस्ट रोजीच्या बंददरम्यान वाळूज औद्योगिक क्षेत्रात झालेला हिंसाचार करणाऱ्यांमध्ये कंपन्यांमध्ये काम करणारे काही रोजंदारी कर्मचारीही होते, असे पोलीस तपासात पुढे येऊ लागले आहे. केवळ मराठा आंदोलकच नाही तर इतर समाजातील गुन्हेगारही सहभागी झाले होते, असे दिसून आले आहे. अटक करण्यात आलेल्या ५३ जणांमध्ये विविध समाजाची मंडळी होती, असे दिसून आल्यामुळे हिंसाचार नक्की कोणी घडवला, याविषयीचे संशय वाढले आहे. प्रत्येक अंगाने अजूनही तपास सुरू आहे. त्यामुळे लगेच कोणत्याही निष्कर्षांप्रत येणे योग्य होणार नाही, असे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी पत्रकारांना सांगितले. दरम्यान, विविध कंपन्यांमध्ये झालेल्या नुकसानीचा पंचनामा महसूल प्रशासनाकडून केला जात आहे.

उद्योजकांच्या सीआयआय या संघटेनेचे पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथे सोमवारी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेतली. झालेला घटनाक्रम त्यांना सांगताना सुरक्षा व्यवस्थेकडे कधी दुर्लक्ष होत आहे, हे  सांगितले. वाळूज एमआयडीसीत जाण्यासाठी एकमेव प्रवेश रस्ता आहे. आणखी एक पर्यायी रस्ता काढण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर सुरक्षा भिंत उंच करणे आणि स्वतंत्र पोलीस चौकी देणे यावरही चर्चा करण्यात आली. रांजणगाव येथे स्वतंत्र पोलीस चौकी देण्याबाबतच्या प्रस्तावाबाबत सकारात्मक असल्याचे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी सांगितले. तात्पुरत्या स्वरुपात या भागातील पोलीस बळ वाढविले जाईल, असेही उद्योजकांना त्यांनी सांगितले. वाळूज परिसरातील दारू दुकाने हटविण्याच्या अनुषंगानेही चर्चा झाली.

तसा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना पाठविला जाईल, असे सांगण्यात आले होते. या अनुषंगाने जिल्हाधिकारी उदय चौधरी यांना विचारले असता ते म्हणाले की, असा काही प्रस्ताव आला आहे की नाही, याची खातरजमा केल्याशिवाय बोलता येणार नाही. मात्र, आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्य़ात ९ ऑगस्टपासून स्वातंत्र्यदिनापर्यंत बंदी घालण्यात आली होती. कंपन्यांच्या झालेल्या नुकसानीचा पंचनामाही सुरू आहे.

महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी सांगितले की, सिमेन्स, इन्डय़ूरन्स आणि व्हेरॉक या तीन कंपन्या वगळता अन्य कंपन्यांचे पंचनामे आता पूर्ण झाले आहेत. एनआरबी बेअरिंग या कंपनीचे दोन कोटी १० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तर कॉस्मो फिल्मचे तीन कोटी ८९ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. कॅनपॅक इंडियाचे नुकसान दीड कोटी रुपयांच्या आसपास असून स्टरलाइटमधील तोडफोडीत दीड कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. आकार टूल्समधून काही दंगेखोरांनी थेट पाने पळविले होते. तेथील नुकसान दोन  कोटी रुपयांचा असल्याचा पंचनामा करण्यात आला आहे. काही कंपन्यांनी आज दिवसभरात तांत्रिक कारणे सांगून पंचनामे होऊ दिले नाहीत.

महसूल विभागाचे प्रतिनिधी पोहोचल्यानंतरही मूल्यांकन करणारे आमचे प्रतिनिधी आलेले नाहीत, असे सांगून कर्मचाऱ्यांना परत पाठविले. या प्रकरणी ९ गुन्हे दाखल झाले असून अटक करण्यात आलेल्या व्यक्तींमधून मराठा आंदोलनातील समन्वयकांचा संबंध नसल्याचे तपासात पुढे येत आहे, असेही सांगण्यात आले. मात्र, आंदोलन आणि कंपन्यांमधील तोडफोड या दोन स्वतंत्र घटना आहेत. त्याचा एकमेकांशी संबंध आहे का, हे तपासले जात असले तरी अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये कंपन्यांमध्ये काम करणाऱ्याच काही रोजंदारी कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे पोलिसांना दिसून आले आहे.

..तर पोलिसांवरही कारवाई व्हावी

बंददरम्यान वाळूज औद्योगिक वसाहतीमध्ये झालेला हल्ला सायंकाळी पाचनंतरचा होता. तेव्हा मी तिथे पोहोचलो होतो, असे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी सांगितले. ते घटनास्थळी उशिरा पोहोचल्याचा आरोप एमआयएमकडून केला जाऊ लागला आहे. तपासात हलगर्जीपणा केला असल्यास पोलिसांवरही कारवाई व्हावी, अशी आपली मागणी असल्याचे आमदार इम्तियाज जलील यांनी सांगितले. नाशिक, पुणे आणि औरंगाबाद येथील हल्ल्यांमध्ये एकसूत्रीपणा आहे का, या अंगानेही तपास केला जात असल्याचे पोलीस आयुक्तालयातील सूत्रांनी सांगितले.