मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच पोहरागड येथे बंजारा समजाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बंजारा समाजासाठी ५३७ कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार केल्याची घोषणा केली. तसेच सेवालाल महाराजांच्या महिमेमुळे जे पैसे देतात त्यांचं सरकार सत्तेत आलं, असं विधान फडणवीसांनी केलं.
उपस्थित बंजारा समुदायाला संबोधित करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सेवालाल महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी आपण जेव्हा पोहरागड येथे येतो. त्यावेळी आपण काशीला आलोय, असं वाटतं. कारण पोहरागड ही बंजारा समाजाची काशी आहे. ज्याप्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी विश्वनाथला एक नवीन स्वरुप दिलं. त्यांनी काशीचा कायापालट केला. त्याचप्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आम्ही मिळून बंजारा समाजाच्या काशीचा (पोहरागड) कायापालट करणार आहोत.
हेही वाचा- “कायद्याचा अभ्यास करून सरकार स्थापन केलं”; फडणवीसांचं विधान, सुप्रीम कोर्टाच्या निकालावरही भाष्य
“मागच्या काळात आम्ही याठिकाणी काम सुरू केलं होतं. संजय राठोड यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. त्यांनी एवढी मेहनत घेतली, काम सुरू झालं. पण मध्ये अडीच वर्षे तुम्हाला फुटकी कवडीदेखील मिळाली नाही. आम्ही जेवढे पैसे दिले होते, त्यानंतर एक पैसाही मिळाला नाही. पण सेवालाल महाराजांची महिमा बघा… जे पैसे देत नव्हते त्यांना घरी बसवलं आणि जे पैसे देतात त्यांना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली पुन्हा सत्तेत आणलं,” असं विधान देवेंद्र फडणवीसांनी केलं.
हेही वाचा- “अद्याप बलात्काराचा गुन्हा…”, जितेंद्र आव्हाडांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा
“आता पैशांची कमतरता पडू देणार नाही, एकनाथ शिंदे यांनी मला तिजोरीची चावी दिली आहे. त्यांनी मला सांगितलं तुम्हाला अर्थमंत्री केलंय. राज्याची तिजोरी बंजारा समाजासाठी खुली करून टाका. त्यामुळे आम्ही ५३७ कोटींचा आराखडा तयार केला आहे. आता मी दाव्याने सांगतो की, आता काम थांबू देणार नाही. बंजारा भवन, मंदिराच्या आजुबाजूचा विकास, रामराव बापुंच्या समाधीचा विकास, या सगळ्या कामांमध्ये आता आम्ही पुढाकार घेऊ…” अशी ग्वाही फडणवीसांनी दिली.