शहरातील जीवघेण्या रहदारीने गेल्या काही दिवसांतील पाचवा बळी बुधवारी घेतला. औरंगाबाद रस्त्यावरील अपघातात महानगरपालिकेचे कर्मचारी ब्रीजलाल बिज्जा जागीच ठार झाले. त्याचे तीव्र पडसाद लगेचच उमटले. महापौरांसह अन्य नगरसेवक तसेच मनपाच्या कर्मचा-यांनी मनपासमोरच रास्ता रोको करून अवजड वाहनांना शहरात प्रवेशबंदीच्या मागणीबरोबरच प्रशासनाचा निषेध केला.
मनपा मुख्यालयापासून १०० मीटर अंतरावर दुपारी ३ वाजता हा अपघात झाला. मनपाचे शिपाई ब्रीजलाल बिज्जा (वय ५०) कार्यालयीन टपाल घेऊन सायकलने ते वाटपासाठी निघाले असता टॉपअप पेट्रोल पंपासमोर औरंगाबादकडून आलेल्या मालमोटारीने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत त्यांचे जागीच निधन झाले.
मनपाच्या सामान्य प्रशासन विभागात कार्यरत असणारे बिज्जा अत्यंत कामसू म्हणूनच परिचित होते. हा अपघात व त्यांच्या निधनाचे वृत्त लगेचच मनपात आले, त्या वेळी महापौर संग्राम जगताप यांच्यासह नगरसेवक कैलास गिरवले, संजय घुले, माजी नगरसेवक निखिल वारे, मनेष साठे आदी मनपातच होते. त्यांच्यासह मनपाच्या कर्मचाऱ्यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त करतानाच शहरातून सुरू असलेल्या अवजड रहदारीबद्दल प्रशासनाचा निषेध करून लगेचच मनपासमोर रास्ता रोको आंदोलन केले. त्याच वेळी कामगार संघटनेचे सचिव अनंत लोखंडे हेही येथे आले. त्यांनी या आंदोलनात उतरून प्रशासनाचा निषेध केला. दरम्यान, बिज्जा यांच्या मृतदेहाचे गुरुवारी शवविच्छेदन होणार असून त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील.
शहरातील बेशिस्त वाहतूक आणि तीन-चारही राज्यमार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक यामुळे हे सर्वच रस्ते मृत्यूचे सापळे बनले आहेत. गेल्या पंधरा दिवसांतील हा शहरातील अशा अपघातामधील पाचवा बळी आहे. त्याआधीही अनेकांना यात जीव गमवावा लागला आहे. त्यामुळेच नागरिकांच्या भावना तीव्र असून वरील दोन्ही कारणांमुळे शहरातील एकही रस्ता सुरक्षित राहिलेला नाही, त्यावर राजकीय पक्षांनीही प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. त्यावर आंदोलनेही सुरू आहे. मात्र बाहय़वळण रस्त्याच्या दुर्दशेमुळे अवजड वाहने सर्रास शहरातूनच ये-जा करतात, ती तातडीने बंद करावी अशी मागणी आता चांगलीच पेटली आहे.
बैठकीच्या वेळीच अपघात
विशेष म्हणजे इकडे हा अपघात, त्यानंतरचा गोंधळ सुरू असतानाच जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्याकडे शहरातील रहदारीच्या प्रश्नावरच बैठक सुरू होती. प्रामुख्याने बाहय़वळण रस्त्याचा विषय या बैठकीत होता.