कारागृहातील कैद्यांना फाशी देणाऱ्या व्यक्तीस (जल्लाद) आता यापुढे पाच हजार रुपये तर कैद्याच्या अंत्यविधीसाठी पंधरा हजार रुपये देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ज्या मध्यवर्ती कारागृहामध्ये फाशीची शिक्षा देण्यात येईल, त्या कारागृहाच्या निधीतून हा खर्च करण्यात येणार आहे.
मुंबईवरील हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब याला येरवडा कारागृहात फाशीची शिक्षा देण्यात आली. त्यानंतर कसाबला फाशी देणाऱ्यास पाच हजार देण्याची घोषणा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केली होती. आता शासनाने फाशी देणाऱ्या प्रत्येक जल्लादाला पाच हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.  महाराष्ट्रात १९९५ नंतर फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यात आलेली नव्हती. फाशी देणाऱ्या जल्लादास २१ मे १९६२ च्या निर्णयानुसार दहा रुपये मोबदला देण्यात येत असे. विशेष बाब म्हणून कारागृह महानिरीक्षक २५ रुपये देऊ शकत होते. हा मोबदला वाढवण्याचा निर्णय शासनाच्या विचाराधीन होता. त्यानुसार फाशी देणाऱ्या व्यक्तीस (जल्लाद) पाच हजार देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्याच प्रमाणे कैद्याला फाशी दिल्यानंतर मृतदेहाची त्याच्या-त्याच्या धर्माप्रमाणे, दफन करण्यासाठी कारागृह अधीक्षकांना १८ जानेवारी १९७१ च्या निर्णयाप्रमाणे पन्नास रुपये खर्च देण्यात येत होता. त्यामध्येही शासनाने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे त्यासाठी पंधरा हजार रुपये देण्याचा निर्णयही घेतला आहे. हा खर्च ज्या मध्यवर्ती कारागृहामध्ये कैद्याला फाशीची शिक्षा देण्यात आली आहे. त्या मध्यवर्ती कारागृहाच्या त्या-त्या वित्तीय वर्षांच्या मंजूर कार्यालयीन खर्चामधून करण्यात येईल.  याबाबत राज्याच्या कारागृहाच्या प्रमुख मीरा बोरवणकर यांनी सांगितले, की शासनाचा निर्णय आम्हाला मिळाला आहे. गृहमंत्र्यांनी कारागृहाच्या कर्मचाऱ्यांना पोलिसांप्रमाणेच सुविधा दिल्या जातील, असे सांगितले असून हा निर्णयही चांगला आहे.