पुण्यातील भोसरी जमीन घोटाळ्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे अडचणीत सापडले आहेत. एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना सक्तवसुली संचालनालयाने अर्थात ईडीने अटक केली आहे. त्यानंतर एकनाथ खडसे यांनादेखील समन्स बजावण्यात आलेलं असून, त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आली आहे. ईडीसमोर हजर राहण्यापूर्वी खडसे पत्रकार परिषद घेणार होते. मात्र, त्यापूर्वीच त्यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर ते चौकशीला हजर राहणार की नाही याबाबत शंका होती. मात्र ते आज ईडी कार्यालयात चौकशीला जाणार आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे.

ईडीच्या चौकशीला हजर राहणार

गुरुवारी सकाळी ११ वाजता चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश एकनाथ खडसेंना देण्यात आले आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरुन, एकनाथ खडसेंची प्रकृती खालावल्यामुळे त्यांची आजची पत्रकार परिषद रद्द केल्याची माहिती देण्यात आली होती. अशातच एकनाथ खडसे यांनी स्वतः माध्यमांशी बोलताना ईडी चौकशीसाठी हजर राहणार असल्याची माहिती दिली आहे. चौकशी दरम्यान पूर्ण सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी संवाद साधताना मी भाजपा सोडून राष्ट्रवादीत आल्यानंतर माझ्यावर चौकशी सुरू झाली आहे, असा आरोप केला. “या कारवाईमागे राजकीय सुडाचा वास येतोय. मी पक्ष बदलला. राजकीय हेतूने ही कारवाई सुरू आहे. नाथाभाऊंना छळण्यासाठीचं हे षडयंत्र सुरू आहे. जळगावमध्ये व्हॉट्सअॅपवर भाजप कार्यकर्त्यांच्या ग्रुपवर अभी कुछ होनेवाला है असा मेसेज फिरत आहे. यातून हे सर्व राजकीय हेतूने प्रेरित असल्याचं दिसून येत आहे. पण मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे”, असे खडसे म्हणाले.

“ईडी कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी मी जात आहे आणि नेहमीच ईडीला सहकार्य केले आहे. आजही ज्या प्रश्नांबाबत चौकशी करण्यात येईल त्याबाबत मी उत्तर देणार आहे. ज्या भूखंडाबाबत चौकशी सुरु आहे तो मुळात वादग्रस्त आहे. एमआयडीसीचा भूखंड असल्याचे सांगून अद्याप त्याचा ताबा त्यांच्याकडे नाही. भूसंपादनाची प्रक्रिया एमआयडीसीतर्फे केलेली नाही. आता एमआयाडीसी या जागेवर दावा करत आहे. भूखंडाबाबत मोबदला दिल्याचे एमआयडीसीने दाखवून द्यावं त्यानंतर हा प्रश्न राहणार नाही,” असे खडसे यांनी म्हटले.

“मुळात खाजगी व्यवहार असल्याचे याची आधी ५ वेळा चौकशी झाली आहे. आता ५ वर्षानंतर पुन्हा ईडीच्या माध्यमातून याप्रकरणाची चौकशी सुरु आहे. मी भाजपा सोडून राष्ट्रवादीमध्ये गेल्यानंतरच ही प्रक्रिया सुरु झाली. मला हेतुबद्दल शंका आहे. गेल्या ८ दिवसांपासून जळगामध्ये कुछ होने वाला हे असा मेसेज फिरत आहे याचा अर्थ कार्यकर्त्यांना याची माहिती होती. राजकीय हेतुने हे सुरु असून मी याबाबतच्या चौकशीला सामोरे जाणार आहे,” असे खडसे म्हणाले.

काय आहे प्रकरण?

एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावाई गिरीश चौधरी यांनी २८ एप्रिल २०१६ रोजी भोसरी एमआयडीसी येथील सव्‍‌र्हे क्र. ५२/२ अ ही जमीन अब्बास रसुलभाई उकानी नामक मूळ जमीन मालकाकडून ३.७५ कोटी रुपयांना खरेदी केली. नोंदणी निबंधकांच्या कार्यालयात या व्यवहाराची रीतसर नोंद केली. अशा प्रकारे एमआयडीसीच्या ताब्यात असलेल्या व त्यांच्या मालकीच्या जमिनीचे खडसे कुटुंबीय सरकारी कागदोपत्री मालक झालेले आहेत. या सर्व व्यवहारात सुमारे ६१ कोटी रुपयांच्या महसुलाचं नुकसान झाल्याचं सकृतदर्शनी दिसून येत आहे. हा मोठा गैरव्यवहार असल्याचा ‘ईडी’ला संशय आहे.