पालिकेच्या प्रसूतिगृहांना आलेल्या अव‘कळां’बाबत आरोग्य समितीच्या बैठकीत चर्चा सुरू असताना अतिरिक्त आयुक्त मनीषा म्हैसकर यांना बोलाविण्याची मागणी सदस्यांनी केली. परंतु आमदारांबरोबर बैठक असल्याचे कारण पुढे करीत म्हैसकर यांनी सभागृहात येण्यास नकार दिल्याने नगरसेवक संतापले. त्यामुळे सदस्यांनी आरोग्य समितीची बैठक तहकूब करून महापौरांकडे गाऱ्हाणे मांडले. मात्र आरोग्य समितीच्या बैठकीत म्हैसकर येतील आणि चर्चा करतील असे सांगत महापौरांनी त्यांची पाठराखण केली.
पालिकेच्या २७ रुग्णालयांमध्ये ६१७ डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे सेवेत असलेल्या डॉक्टरांवर कामाचा ताण आहे. पालिकेच्या प्रसूतिगृहांची अवस्था अत्यंत बिकट आहे. डॉक्टर, परिचारिका, आया, वॉर्डबॉय यांची संख्या अपुरी आहे. सुविधांचाही अभाव आहे. या गंभीर प्रश्नावर प्रशासनाकडून असमाधानकारक उत्तर मिळाल्याने म्हैसकर यांनीच माहिती द्यावी, अशी मागणी सदस्यांनी केली. दोन वेळा त्यांच्याशी मोबाइलवर संपर्कही साधण्यात आला. परंतु त्यांनी  येण्यास नकार दिल्यामुळे आरोग्य समितीची बैठक तहकूब करण्यात आली. त्यानंतर आपले गाऱ्हाणे घेऊन सदस्य महापौरांकडे गेले. अतिरिक्त आयुक्तांच्या विरोधात बोलण्यास महापौर अनुकूल नसल्याचे दिसताच सदस्य नाराज झाले. अखेर सभागृह नेते यशोधर फणसे यांनी सभागृहात हा मुद्दा उपस्थित करण्याचा मार्ग काढला आणि महापौरांच्या दालनातून सदस्य निघून गेले.
शिवसेनेच्या शीतल म्हात्रे यांनी हरकतीचा मुद्दा मांडला आणि त्यानंतर आरोग्य समितीवरील नगरसेवकांनी म्हैसकरांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले. आरोग्य विभागाची सूत्रे हाती असलेल्या म्हैसकर आरोग्य समितीच्या बैठकीत कितीदा आल्या याचे संशोधन करावे लागेल, असा टोलाही त्यांनी हाणला. प्रसूतिगृहांबाबत विशेष बैठक घेऊ. तत्पूर्वी म्हैसकर आरोग्य समितीच्या बैठकीत येतील, अशी समजूत काढत सुनील प्रभू यांनी मुळ मुद्दय़ालाच बगल दिली.