शहरातील वादग्रस्त खान्देश मिलच्या कोटय़वधीच्या जागेची परस्पर विक्री करून तिथे अनधिकृत बांधकाम करणारे रमेश जैन व त्यांच्या राजमुद्रा रिअल इस्टेट कंपनीविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
खान्देश मिलच्या संदर्भात काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते उल्हास साबळे हे जिल्हा प्रशासन तसेच राज्य सरकारकडे दहा वर्षांपासून सातत्याने तक्रारी करीत आहेत. तत्कालीन ब्रिटिश सरकारने ही जागा औद्योगिक वापरासाठी कंपनीला ९९ वर्षांच्या कराराने दिली होती. तो करार १९७८ मध्येच संपुष्टात आल्याने ती जागा सरकारजमा करावी, अशी साबळे यांची मूळ मागणी आहे.
तथापि, शेकडो कोटी रुपयांची जागा रमेश भीकचंद जैन यांनी अत्यल्प किमतीत राजमुद्रा रिअल इस्टेटच्या नावाने खरेदी करून त्या जागी अनधिकृत बांधकाम केल्याची साबळे यांची तक्रार आहे. या जागेचा औद्योगिक वापर होत नसल्याने करार भंग होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. रमेश जैन हे घरकुल घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले आ. सुरेश जैन यांचे भाऊ आहेत.
शहराच्या रेल्वे स्टेशनलगतच असलेल्या खान्देश मिलच्या जागेतीलच सव्‍‌र्हे क्रमांक २१२४ हा भूखंड ब्रिटिश सरकारने १९१३ मध्ये मूलजी जेठा कंपनीस धर्मशाळेसाठी ५० वर्षांच्या कराराने दिला होता. तो करार संपल्यावर वाढवून दिला गेला नाही. तसेच त्या जागेचा वापर धर्मशाळेसाठी होत नसल्याने ती जागा सरकारजमा करावी, असे निवेदन साबळे यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी संजीव कुमार यांना दिले होते. त्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी १६ जुलै २०११ रोजी ती जागा सरकारजमा करण्याचे आदेश दिले होते. या भूखंडावर कारवाई होते, तर उर्वरित जागेवर का नाही, असा साबळे यांचा प्रश्न असून सुमारे दहा वर्षांपासून ते जिल्हा प्रशासनासह शासनाकडे त्यासाठी पाठपुरावा करत आहेत.