संगमनेर : पुणे-नाशिक महामार्गावरील संगमनेर खुर्द आणि संगमनेर बुद्रुकला जोडणारा ब्रिटिशकालीन पूल आजही वापरात आहे. या पुलासह राज्यातील सर्व जुन्या काळातील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे, अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी अधिवेशनात केली. संगमनेरातील रखडलेल्या कामाबाबतही त्यांनी शासनाचे लक्ष वेधले.            

जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून किती दिवसांमध्ये पुनर्बांधणी होणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सार्वजनिक बांधकाम विभागाची रस्त्यांची कामे ठरलेल्या वेळेत पूर्ण होत नाहीत. शासन निधी खर्च करायला तयार आहे, परंतु सुरू केलेली कामे वेळेत पूर्ण होत नाहीत. त्याचा परिणाम दळणवळण व्यवस्थेवर होतो. जनतेची गैरसोय होते, ही बाब लक्षात घेता वेळेत काम पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाई करा, अशी लक्षवेधी आमदार खताळ यांनी मांडली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

असा आहे जुना पूल…

संगमनेर बुद्रुक आणि खुर्द या दोन गावांना जोडणाऱ्या प्रवरा नदीवरील ब्रिटिशकालीन पुलाचे संपूर्ण बांधकाम पक्क्या दगडात आहे. बांधकामाचा तपशील उपलब्ध नसला, तरी पुलाने वयाची शंभरी कधीच पूर्ण केली आहे. त्यानंतर आजतागायत अनेक वेळा या पुलाची डागडुजी करण्यात आली. पुलाचे निर्धारित आयुष्य संपल्याचे काही वर्षांपूर्वी ब्रिटिश सरकारने संगमनेर नगर परिषदेला पत्र लिहून कळवले होते. पूर्वी एकाच पुलावरून दुहेरी वाहतूक होत असे. सध्या समांतर नवीन पूल बांधल्यामुळे जुन्या पुलावरून एकेरी वाहतूक होते. पूल सद्य:स्थितीत भक्कम दिसत असला, तरी एखादी दुर्घटना घडून गेल्यानंतर जागे होण्यापेक्षा स्ट्रक्चरल ऑडिट करणे अत्यावश्यक आहे. नवीन पूल बांधायचे ठरले, तरी सध्याच्या पुलाचे ‘हेरिटेज’ म्हणून जतन करणे आवश्यक आहे. अकोले रस्त्यावरील चिखली व कळस येथील पूल ब्रिटिशांनी बांधले. चिखलीचा पूल जमीनदोस्त करण्यात आला. कळस येथे नवीन पूल झाल्याने ब्रिटिशकालीन पूल शेवटच्या घटका मोजत आहे.