राहाता : कोपरगाव ते शिर्डी महामार्ग दुरुस्तीचे काम गेल्या तीन वर्षांपासून अत्यंत संथ गतीने सुरू आहे. काम करताना आवश्यक काळजी न घेतल्याने व ठेकेदाराने कामात दिरंगाई व निष्काळजीपणा केल्यामुळे कोपरगाव शहरातील येवला नाका ते आत्मा मलिक रुग्णालय या साधारण चार किमी. अंतरात एकूण ५३ अपघातांची नोंद पोलिसांकडे झाली आहे. या अपघातास जबाबदार धरून रस्त्याच्या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी कोपरगाव येथील लोकस्वराज्य आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष ॲड. नितीन पोळ यांनी केली आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात ॲड. पोळ यांनी म्हटले की, कोपरगाव ते अहिल्यानगर रस्त्याची अनेक वर्षापासून दुरवस्था झाली आहे. या रस्त्याचा समावेश राष्ट्रीय महामार्गमध्ये करण्यात आला, काँक्रिटीकरणास मंजुरी मिळाली. रस्त्याचे काम सुरू झाले. मात्र ठेकेदाराने वेळेत काम पूर्ण करणे आवश्यक होते. काम सुरू असताना वाहतुकीची कोंडी व अडथळे टाळण्यासाठी काळजी घेणे गरजेचे होते. मात्र राजकीय नेत्यांची अनास्था व प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होऊन अनेकांचे बळी गेले तर कित्येकांना कायमचे अपंगत्व आले. राजकीय नेत्यांनी अनेकदा ठेकेदारास काळया यादीत टाकू, अशी घोषणाही केली. मात्र कामात प्रगती होण्याऐवजी ठेकेदाराला कामात मुदतवाढ मिळाली. झगडे फाटा ते वडगाव पान रस्त्याच्या ठेकेदाराची तक्रार विधिमंडळाच्या अधिवेशनात करण्यात आली. प्रत्यक्षात या रस्त्यावरील अपघातांच्या कारणांची चर्चा होणे व शासन स्तरावरून ठेकेदारावर कामातील दिरंगाईवर कारवाई होणे, आवश्यक होते. याकडे ॲड. पोळ यांनी लक्ष वेधले.ृ
चार किमी. अंतरातील ५३ अपघातांत २१ मृत्यू
येवला नाका ते आत्मा मलिक रुग्णालयादरम्यान, कोपरगाव ते शिर्डी या रस्त्यावर १ जानेवारी २०२० ते १ जून २०२५ या कालावधीतील अपघातांची माहिती शहर पोलिसांकडे, माहिती अधिकारात विचारली असता, एकूण ५३ अपघातात २१ जण मृत्युमुखी तर ३२ जणांना अपंगत्व आले, तर इतर किरकोळ अपघातांची तक्रार पोलिसांकडे नाही. – ॲड. नितीन पोळ, लोकस्वराज्य आंदोलन, प्रदेशाध्यक्ष