“इटली, अमेरिका, स्पेनमधील करोना बळींपासून धडा घेऊन जनतेने आतातरी शहाणं व्हावं. जीवाची जोखीम पत्करुन करोनाविरुद्ध लढणाऱ्या डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ, पोलीस, सफाई कामगार यासर्वांच्या त्यागाचा सन्मान करावा. भाजीखरेदीसाठी गर्दी करणं बंद करावं. घरातंच थांबून कोरोनाविरुद्धच्या लढ्यात योगदान द्यावं,” असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला केले आहे. “करोनाविरुद्धच्या लढ्यात बेजबाबदारपणे वागणाऱ्यांची, नियम मोडणाऱ्यांची आता खैर नाही,” असा इशाराही त्यांनी दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“राज्यातील करोना रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर भाजीखरेदीसाठी सकाळच्या बाजारात उसळणारी गर्दी बघितल्यानंतर टाळाबंदीचा उद्देशच धोक्यात आला आहे. जनतेने घराबाहेर पडून अनावश्यक गर्दी करणं सुरुच ठेवलं तर सद्यस्थितीचा पुनर्विचार करुन कठोर उपाय योजावे लागतील”, असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे. करोनाच्या संकटाविरुद्ध राज्याचा सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकिय शिक्षण विभाग, पोलीस विभाग, नगरविकास विभाग, ग्रामविकास विभाग, महसूल विभाग, अन्न व नागरी पुरवठा, अन्न व औषध प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच शासनाची संपूर्ण यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहे. राज्यातील बहुतांश नागरिक घरीच थांबून कोरोनाविरुद्धच्या लढ्यात योगदान देत आहेत, या सर्वांचं उपमुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहेत.

“बेजबाबदारपणानं वागणाऱ्या मोजक्या व्यक्तींमुळे करोनाविरुद्धच्या लढ्याला धक्का बसत आहे. हा बेजबाबदारपणा आता सहन केला जाणार नाही. करोनाविरुद्धचा लढा जिंकायचा असेल, बेजबाबदारपणा दाखवणाऱ्यांची, नियम मोडणाऱ्यांची यापुढे खैर केली जाणार नाही,” असा स्पष्ट इशारा उपमुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deputy cm ajit pawar warned will review the current situation and take more drastic steps coronavirus lockdown jud
First published on: 01-04-2020 at 13:27 IST