scorecardresearch

कचरा वेचणाऱ्या मुलांच्या जीवनात शिक्षणाची नवी पहाट ; निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसेंची संकल्पना

प्रशासनाच्या शाळाबाह्य सर्वेक्षणात कचरा वेचणाऱ्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न समोर आला.

कचरा वेचणाऱ्या मुलांच्या जीवनात शिक्षणाची नवी पहाट ; निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसेंची संकल्पना
(संग्रहित छायाचित्र)

प्रबोध देशपांडे, लोकसत्ता

अकोला : अकोल्यात कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर अंधकारमय आयुष्य जगणाऱ्या मुलांच्या जीवनात शिक्षणाची नवी पहाट उजाडली. निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या संकल्पनेतून संस्कार वर्ग चालविण्यात येतात. या वर्गात अगदी नर्सरीपासून ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी शिक्षणाचे धडे घेत आहेत. कचरा वेचून जीवन जगणारे वंचित, गरजू मुले आता ‘हम होंगे कामयाब’ म्हणत उज्ज्वल भविष्याचे स्वप्न उराशी बाळगून शिक्षणाच्या वाटेवर लागले आहेत.

राज्यात शाळाबाह्य मुलांची मोठी गंभीर समस्या आहे. शासनाकडून त्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विविध प्रयत्न करण्यात येतात. मात्र, तरीही घरातील हलाखीच्या परिस्थितीमुळे पोटाची खळगी भरण्याच्या नादात हजारो मुले शिक्षणापासून वंचित राहतात. अकोला जिल्ह्यातदेखील प्रशासनाकडून शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करून त्यांना शाळेत प्रवेश देण्याच्या दृष्टीने विशेष मोहीम राबविण्यात आली. त्यामध्ये अनेक विद्यार्थी शाळाबाह्य असल्याचे आढळून आले. अकोला शहरालगत नायगाव परिसरामध्ये कचरा टाकण्याचे ठिकाण (डम्पिंग ग्राऊंड) आहे. या ठिकाणी कचऱ्याचे डोंगर तयार झाले. त्याच्या आजूबाजूला मोठी झोपडपट्टी वसली आहे. त्या ठिकाणी राहणारे बहुतांश कुटुंबे मोलमजुरी, कचऱ्यातून मिळणारे भंगार विकून आपले जीवन जगतात. त्यातील अनेक कुटुंबांना शिक्षणाचा गंध नाही. त्यांची लहान-मोठी मुलेदेखील कचरा वेचून आपल्या आई-वडिलांना सहकार्य करतात. त्यातील काही मुले जवळच्या शाळेतदेखील जातात. अनेक मुले शिक्षणापासून दुरावा ठेवून होती. अशी मुले भविष्यात गुन्हेगारी व चुकीच्या मार्गावर जाण्याचा धोका असतो. प्रशासनाच्या शाळाबाह्य सर्वेक्षणात कचरा वेचणाऱ्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न समोर आला.

कचरा वेचणाऱ्या मुलांना शिक्षण देण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या संकल्पनेतून २६ जानेवारीपासून संस्कार वर्गाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. या उपक्रमाला तीक्ष्णगत बहुउद्देशीय संस्थेचे सहकार्य लाभले. प्रशासनात वरिष्ठ अधिकारी होण्यापूर्वी संजय खडसे हे प्राध्यापक होते. त्यांच्यातील शिक्षक त्यांना शांत बसू देत नव्हता. त्यामुळे कचरा वेचणाऱ्या मुलांचे जीवन शिक्षणाने समृद्ध करण्याचा संकल्प प्रा. संजय खडसे यांनी केला. गेल्या आठ महिन्यांपासून हे संस्कार वर्ग सुरू आहेत. परिसरातील ६० विद्यार्थी संस्कार वर्गात शिक्षणाचे धडे घेतात. अगदी दोन-तीन वर्षांच्या चिमुकल्यापासून ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा त्यात समावेश आहे. शिक्षणासोबतच त्या मुलांच्या सर्वागीण विकासासाठी विविध उपक्रमदेखील राबवले जातात. दररोज सायंकाळी ५ वाजाता परिसरातील सभागृहात हा संस्कार वर्ग भरतो. या परिसरातच वास्तव्यास असलेला उच्चशिक्षित तरुण विशाल नंदागवळी हा त्या मुलांना शिकवण्याचे कार्य निरंतरपणे करीत आहे. प्रा. संजय खडसे आपल्या व्यस्त कार्यातून वेळ काढून विद्यार्थ्यांना धडे देतात. सुट्टीच्या दिवशी व दर शनिवारी ते नियमितपणे त्या मुलांना नि:शुल्क शिकवण्याचे अनमोल कार्य करीत आहेत. पूर्वी अक्षरओळखही नसलेले मुले आता लिहू, वाचू शकतात. काही पालकवर्गदेखील या संस्कार वर्गात सहभागी होतो. विद्यार्थ्यांचे वय व शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा वर्ग लक्षात घेऊन त्यांना शिकवले जाते. शिक्षणासोबतच त्यांना संस्कारदेखील दिले जातात. त्यामुळे मुलांत सकारात्मक बदल दिसून येत आहेत. झोपडपट्टी परिसरातच आपल्या मुलांना विशेष शैक्षणिक उपक्रमातून शिक्षण व संस्कार मिळत असल्याने पालकवर्ग आनंदित झाला. या प्रकारच्या उपक्रमातून खऱ्या अर्थाने समाजपरिवर्तनाचे कार्य होत आहे.

स्वयंसेवी संस्थांचा मदतीचा हात

निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या संस्कारवर्गाला विविध स्वयंसेवी संस्थांनी मदतीचा हात दिला आहे. या संस्कारवर्गातील विद्यार्थ्यांचा स्नेहबंध मेळावा प्रभात किड्स शाळेत भरला होता. वर्गात फळय़ाची गरज ओळखून सामर्थ्य फाऊंडेशनने वर्गाला एक मोठा व्हाइट बोर्ड भेट देऊन मुलांना खाऊचे वाटप केले. सातत्याने असे उपक्रम संस्कारवर्गात राबवले जात आहेत.

अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत कचरा वेचून जीवन जगणाऱ्या मुलांच्या जीवनात शिक्षणाची गंगा आणण्यासाठी संस्कारवर्गाचा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याला परिसरातील मुले, पालकांचा चांगला प्रतिसाद लाभतो. त्या मुलांच्या जीवनात शिक्षणाच्या माध्यमातून परिवर्तन घडविण्याचा आमचा प्रयत्न आहे.

प्रा. संजय खडसे,  निवासी उपजिल्हाधिकारी, अकोला

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या