केवळ हिंदूंचा देश निर्माण करणारी सुप्त आकांक्षा बाळगणारा काळोख पुन्हा येऊ घातला आहे. याबाबत मला मोदींचा राग नाही. मात्र कुणीतरी हुकूमशहाने येऊन आपली परिस्थिती सुधारावी, अशी अपेक्षा बाळगणाऱ्या सर्वसामान्यांच्या हतबलतेविषयी तक्रार असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार अमर हबीब यांनी व्यक्त केले.
शिंगोली येथील परिवर्तन बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सामाजिक कार्यकत्रे डॉ. हमीद दाभोलकर व ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकाचे लेखक राजकुमार तांगडे यांना सम्यक पुरस्कार देऊन रविवारी गौरविण्यात आले. यावेळी हबीब बोलत होते.
अमर हबीब म्हणाले की, मुलाला, नातवाला शाळेत घालण्यासाठी गेलो असता आपणास सरस्वती स्तवन पाठ करायला सांगणाऱ्या िहदूंची शाळा दिसली. तशीच उर्दू शिकवायला सांगणारी मुस्लिमांची शाळाही दिसली. परंतु माणसाला माणूसपण देणाऱ्या माणसांची शाळा दिसली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. महात्मा गांधींपर्यंत त्यागाची घराणेशाही होती. आता त्यागाची जागा भोगाने घेतली असून, राजकारणात केवळ कार्यकर्त्यांचा वापर केला जात आहे. डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो. अभियंत्याचा मुलगा अभियंता होतो. मात्र सामाजिक कार्यकर्त्यांचा मुलगा तो वारसा पुढे चालवित नाही. कारण त्यागाशिवाय तेथे काहीच मिळणार नाही, हे त्याला माहिती असते. तरीदेखील डॉ. नरेंद्र दाभोलकरांची पुढची पिढी त्यागाचा हा वारसा खंबीरपणे पुढे घेऊन जात असल्याचे सांगून ज्यांचे पोट खऱ्या अर्थाने शेतीवर अवलंबून आहे, शेतातल्या पशातूनच ज्यांची चूल चालते, तो खरा शेतकरी. मात्र गारपिटीची नुकसानभरपाई घ्यायला आज नोकरदारवर्गही रांगा लावत असल्याचे वास्तव त्यांनी बोलून दाखविले.
विकासासाठी काम करणाऱ्यांची कोंडी : दाभोलकर
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या होऊन आता आठ महिने उलटत आहेत. मारेकरी पकडले गेले नसले, तरी खुनामागील प्रवृत्ती सर्वाना ज्ञात असल्याचे सांगत, केंद्रात सत्तेत असलेले पंतप्रधानांच्या पकडलेल्या खुन्यांना शिक्षा देऊ शकत नाहीत, ते दाभोलकरांच्या न पकडलेल्या मारेकऱ्यांना काय शिक्षा देणार, असा सवाल हमीद दाभोलकर यांनी केला. ते म्हणाले विचारी कार्यकर्त्यांची आज कोंडी झाली असून, अशा स्थितीत केवळ विवेकाचाच रस्ता यातून मार्ग दाखवेल. दाभोलकरांच्या हत्येनंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम थांबेल, अशी भाबडी आशा काहींना होती. परंतु प्रबोधनाचे हे काम दुप्पट वेगाने सुरू आहे. राज्यातील अंनिसच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी समाज भक्कमपणे उभा राहिल्यानेच हे शक्य झाल्याचे सांगत, हा पुरस्कार त्याचेच प्रतीक असल्याचे दाभोलकर म्हणाले. देशात सर्वप्रथम जादूटोणा विरोधी कायदा संमत करून घेण्यात अंनिसला यश आले. कायदा लागू झाल्यानंतर राज्यात आजपर्यंत ६० हून जास्त गुन्हे नोंद झाले. यात चार नरबळीच्या प्रकरणांचा समावेश आहे. या गुन्ह्यांची तीव्रता पाहिली असता, हा कायदा किती आवश्यक होता, याचीच प्रचिती येते असेही ते म्हणाले.
क्रांतीचा विचार भीमनगरमध्येच : तांगडे
छत्रपती शिवाजी महाराजांसोबत अठरापगड जातीचे सहकारी होते. आजच्या काळात जर शिवाजी महाराज अवतरले तर त्यांच्यासोबत नेमके कोणते मावळे असतील, असा प्रश्न पडतो. तेव्हा मला भीमनगर मोहल्ला डोळ्यासमोर येतो. कारण केवळ भीमनगरमध्येच क्रांतीचा विचार सांगण्याची ताकद असल्याचे सांगत, तोच विचार मी ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकाच्या माध्यमातून मांडला. शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर या महापुरुषांनी समाजासाठी आयुष्य घालविले. त्यांचे आपण वारसदार आहोत. मग घरात कसे बसणार, असा सवाल करीत, दरवाजे उघडे करणारी आपली संस्कृती असल्याने चार िभतीच्या बाहेर जाऊन शिका, आपले दु:ख, वेदना मांडण्यासाठी पेन हातात घ्या, असे आवाहन त्यांनी केले. आज दलितांवर अन्याय करणारे कोण आहेत, हे आपण जाणतो. कोणातरी दुसऱ्याच्या सांगण्यावरून ते दगडगोटे घेऊन तुमच्यावर येत आहेत. परंतु त्यांना आपलसे करीत विचारांचे बीज आज पेरायचे, उद्या त्याला कणसे नक्की लागतील, असेही ते म्हणाले. प्रारंभी परिवर्तन संस्थेचे अध्यक्ष देवानंद खुने यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन रवींद्र केसकर यांनी केले.
संग्रहित लेख, दिनांक 21st Apr 2014 रोजी प्रकाशित
सर्वसामान्यांची हतबलता चीड आणणारी -अमर हबीब
केवळ हिंदूंचा देश निर्माण करणारी सुप्त आकांक्षा बाळगणारा काळोख पुन्हा येऊ घातला आहे. याबाबत मला मोदींचा राग नाही. मात्र कुणीतरी हुकूमशहाने येऊन आपली परिस्थिती सुधारावी, अशी अपेक्षा बाळगणाऱ्या सर्वसामान्यांच्या हतबलतेविषयी तक्रार असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार अमर हबीब यांनी व्यक्त केले.
First published on: 21-04-2014 at 01:30 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Despair of common man amar habib