Devendra Fadnavis : विरार इमारत दुर्घटनेत आतापर्यंत इमारतीच्या ढिगाऱ्याखालून २४ जणांना बाहेर काढण्यात आले आहे. त्यात १७ जणांचा मृत्यू झाला आहे. अजूनही मागील ४८ तासांपासून राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक व पालिकेच्या अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरू आहे. मंगळवारी रात्री विरार पूर्वेच्या विजयनगर परिसरातील रमाबाई अपार्टमेंट या इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली. या इमारतीच्या ढिगाऱ्यात अनेक कुटुंब गाडली गेली. या कुटुंबांचे शोधकार्य राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक व वसई विरार महापालिका अग्निशमन दलाकडून सुरू करण्यात आले आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोस्ट केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पोस्ट काय?

विरार भागात एक इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झालेला आहे, याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे आणि मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. या सर्व कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असे सांगतानाच मृतांच्या वारसांना ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे.४८ तासांपासून एनडीआरएफच्या मदतीने हे बचाव कार्य राबवले जात आहे आणि ते पुढच्या काही तासात संपेल. आतापर्यंत नऊ जणांना सुरक्षित वाचविण्यात आले आहे. अशी पोस्ट देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

या घटनेतील जखमींची नावं काय?

जखमींमध्ये संजय सिंग(२४), मिताली परमार(२८) प्रदीप कदम( ४०) जयश्री कदम (३३) विशाखा जोविल (२४), मंथन शिंदे (१९) प्रभाकर शिंदे (५७), प्रमिला शिंदे (५०) प्रेरणा शिंदे (२०) अशी नऊ जण जखमी असून त्यांच्यावर वसई विरार मधील शासकीय व खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

४८ तासांपासून बचावकार्य सुरु

मंगळवारी रात्री विरार पूर्वेच्या विजयनगर परिसरातील रमाबाई अपार्टमेंट या इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली. या इमारतीच्या ढिगाऱ्यात अनेक कुटुंब गाडली गेली. या कुटुंबांचे शोधकार्य राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक व वसई विरार महापालिका अग्निशमन दलाकडून सुरू आहे. सुरुवातीला ढिगारा बाजूला करण्यासाठी जेसीबी पोहचू शकत नसल्याने बचावकार्यात अडथळे निर्माण झाले होते. मात्र इमारती आणि बाजूच्या चाळी रिकाम्या करून काही भाग तोडल्याने बचाव कार्याला गती मिळाली. या इमारतीमध्ये चौथ्या मजल्यावर राहणाऱ्या प्रथमेश यांच्या बुधवारी गणपती बाप्पाची स्थापना होणार होती. त्याआधीच रात्री या इमारतीमध्ये दुर्घटना घडली. सध्या रहिवाश्यांना इथून हलविण्यात आलं आहे. प्रथमेश यांनाही आपल्या सामानासह गणपतीची मूर्ती घेऊन घर सोडावे लागलं आहे.