शिंदे गटाकडून ‘राष्ट्रात मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ अशी जाहिरात देऊन एकनाथ शिंदे सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याचा दावा करण्यात आला. यानंतर भाजपा-शिंदे गटाच्या कार्यकर्ते-नेत्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. या जाहिरातीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खोचक प्रतिक्रिया देत सरकारमध्ये भाजपाचं जास्त योगदान नसल्याचं जाहिरातीतून समजल्याचं म्हटलं. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मला शरद पवारांना काहीही उत्तर द्यायचं नाही. अशा गोष्टींना थोडेच उत्तर द्यायचं असतं. आमच्याकडे भरपूर कामं आहेत. अशा गोष्टींवर उत्तर का द्यायचं.”
शरद पवार नेमकं काय म्हणाले होते?
शरद पवार म्हणाले, “आमचा समज होता की, हे जे सरकार बनलं आहे त्यात मोठा वाटा किंवा मोठी संख्या भाजपाची आहे. मात्र, जाहिरातीमुळे आमच्या ज्ञानात भर पडली की, भाजपाचे योगदान यात जास्त नाही. जास्त योगदान अन्य घटकांचं आहे आणि हे कळवण्याचं ऐतिहासिक काम या जाहिरातीच्या माध्यमातून झालं आहे. त्याबद्दल त्यांना धन्यवाद.”
“अडचणी असतील तर त्या अडचणी सोडवू”
धाराशीवची जागा भाजपा लढणार की शिवसेना (शिंदे गट) या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आमच्या पक्षाचं संसदीय मंडळ आहे, केंद्रीय नेतृत्व आहे. धाराशीवच्या जागेवर आमचं केंद्रीय नेतृत्व निर्णय करेल. एकनाथ शिंदे आणि मी एकत्र बसू. कुठेही काही अडचणी असतील तर त्या अडचणी सोडवू.”
“आमच्याही पक्षातील लोकांना सगळीकडे निवडणूक लढवावी असं वाटतं”
“शेवटी सगळ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आपण, आपल्या पक्षाने निवडणूक लढवली पाहिजे हे वाटतं. आमच्याही पक्षातील लोकांना वाटतं की, सगळीकडे आपण निवडणूक लढवावी. तसंच त्यांच्याही पक्षातील लोकांना वाटतं. यात काहीही वावगं नाही. आम्ही दोघे एकत्र आहोत आणि मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवायचं आहे. त्यामुळे मोदींना पंतप्रधान बनवण्यासाठी ज्या व्यक्तीने आणि ज्या पक्षाने निवडणूक लढणे आवश्यक असेल ते लढतील,” असं मत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलं.