सिंचन घोटाळ्याच्या चौकशीत कोणालाही पाठिशी घालण्याचा प्रश्नच येत नाही, असे स्पष्ट करून दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी सांगितले.
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चौकशीसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात बोलाविण्याऐवजी त्यांना प्रश्नावली पाठविण्याच्या पद्धतीवर राजकीय पक्षांनी टीका केली होती. राज्यातील भाजप सरकार अजित पवारांना विशेष सूट देत असल्याचाही आरोप करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर भूमिका मांडताना फडणवीस म्हणाले, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक चांगल्या पद्धतीने या घोटाळ्याच्या चौकशीचे काम करीत आहेत. चौकशीला बोलावण्याअगोदर प्रश्नावली पाठविण्याची पद्धत आहे. मात्र, कोणालाही पाठिशी घालण्याचा प्रश्नच येत नाही. सिंचन घोटाळ्यात दोषी आढळणाऱयांना राज्य सरकार सोडणार नाही. त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.
सिंचन घोटाळ्यात अजित पवार व सुनील तटकरे यांच्या सहभागाबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सध्या चौकशी सुरू आहे.