scorecardresearch

“एवढं पोटात दुखण्यासारखं काय?” देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांवर हल्लाबोल; पोटनिवडणुकीवर बोलताना म्हणाले….

कसबा, चिंचवड पोटनिवडणूक विरोधी पक्षनेते अजित पवार तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिष्ठेची केली होती.

devendra fadnavis and ajit pawar
देवेंद फडणवीस, अजित पवार (फोटो- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

पुण्यातील कसबा आणि चिंचवड या विधानसभेच्या दोन जागांसाठी आज (२६ फेब्रुवारी) मतदानाची प्रक्रिया पार पडली. ही निवडणूक विरोधी पक्षनेते अजित पवार तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिष्ठेची केली होती. या निवडणुकीत भाजपा उमेदवारांच्यां प्रचारात देवेंद्र फडणवीस यांनीदेखील उडी घेतली. हाच मुद्दा घेऊन आज (२६ फेब्रुवारी) अजित पवार यांनी राज्य सरकारवर टीका केली. राज्यातील विकासकामे ठप्प आहेत. सत्ताधारी पोटनिवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत, असे पवार म्हणाले. पवारांच्या याच टीकेला आता देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. आमचे २४ तास काम सुरूच असते. प्रचारात उतरलो तरी आमचे काम थांबत नाही, असे फडणवीस म्हणाले. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

हेही वाचा >> राहुल गांधींच्या सावरकरांवरील नव्या विधानानंतर देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, “तेव्हा मूग गिळून बसायचे, आता…”

मी त्यांना आठवण करून देतो की…

“आम्ही पोटनिवडणुकीच्या प्रचाराला गेलो, त्यामुळे अजित पवार यांच्या पोटात फार दुखत आहे. आम्ही दोन ते तीन दिवसच प्रचारासाठी गेलो. मात्र मी त्यांना आठवण करून देतो की, पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत तेव्हा अजित पवार पूर्णवेळ तिथे बसले होते. नांदेडमध्ये निवडणूक होती, तेव्हा अशोक चव्हाण पूर्णवेळ तिथे बसले होते. निवडणुका आहेत. त्यामुळे प्रचारासाठी गेलं तर त्यात एवढं पोटात दुखण्यासारखं काय आहे?” असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला.

हेही वाचा >> मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याचं जेवणाचं बील २ कोटी ३८ लाख रुपये! अजित पवार संतापले; म्हणाले “चहात काय…”

आमचे सरकार गतीमान- देवेंद्र फडणवीस

“आम्ही प्रचारासाठी गेलो असलो तरी सरकारचे काम कोठेही थांबलेले नाही. आमच्या सरकारने अतिशय वेगाने निर्णय घेतलेले आहेत. महाविकास आघाडी सरकारने त्यांच्या काळात शेतकऱ्यांना एकूण ६ हजार कोटी रुपये दिले. आम्ही सातच महिन्यात मदतीचे तसेच ५० हजार रुपये असे मिळूण एकूण १२ हजार कोटी रुपये दिले. आमचे सरकार गतीमान आहे,” असे फडणवीस म्हणाले.

हेही वाचा >> ‘ठाकरे-शिंदे कधीही एकत्र येऊ शकतात,’ असदुद्दीन ओवैसींचे मोठे विधान; म्हणाले, “ही तर राम-श्यामची….”

आम्ही २४ तास काम करतो- देवेंद्र फडणवीस

“केवळ सात महिन्यांत २३ प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. महाविकास आघाडीच्या काळात सुधारित प्रशासकीय मान्यताच मिळत नव्हती. तेव्हा सगळे प्रकल्प बंदच होते. आमचे सरकार गतीमान आहे. आम्ही एखाद्या निवडणुकीत प्रचाराला गेलो, तरी आम्ही २४ तास काम करतो. आमचे काम कोठेही मागे राहात नाही. त्यामुळे अजित पवार यांच्या पोटात दुखण्याचे कारण नाही,” असा टोलाही फडणवीस यांनी अजित पवार यांना लगावला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-02-2023 at 20:38 IST