Devendra Fadnavis on BJP Welcomes Palghar Sadhu Murder Accused : देशभर करोनामुळे लॉकडाऊन लावलेला असताना, राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना पालघर येथे जमावाने दोन साधूंची हत्या केली होती. राज्याच्या राजकारणात या घटनेने मोठी उलथापालथ झाली होती. या हत्येनंतर भारतीय जनता पार्टीने तेव्हाच्या सत्ताधारी पक्षांवर, प्रामुख्याने शिवसेनेवर (संयुक्त) आणि उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले होते. दरम्यान, या प्रकरणात गंभीर आरोप करण्यात आलेल्या व्यक्तीला भाजपाने पक्षात प्रवेश दिल्याच्या घटनेमुळे आता भाजपाला टीकेचा सामना करावा लागत आहे.
पालघर साधू हत्याकांड प्रकरणी भारतीय जनता पार्टीने काशिनाथ चौधरी यांच्यावर गंभीर आरोप केले होते. मात्र, आता त्याच काशिनाथ चौधरींना भाजपात पक्षप्रवेश दिला आहे. यावरून भाजपावर टीका होत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक स्तरावर घेतलेला हा निर्णय चुकीचा नसल्याचं सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
या प्रकरणी सारवासारव करत देवेंद्र फडणवीस म्हणाले, “हा निर्णय स्थानिक स्तरावर घेण्यात आला आहे. मला जेव्हा हा निर्णय समजला तेव्हा मी याविषयी माहिती घेतली. मुळात या पक्षप्रवेशावरून आमच्यावर जे लोक आरोप करत आहेत ते कालपर्यंत का गप्प होते? चौधरी कालपर्यंत त्यांच्याबरोबरच होते. तेव्हा असे आरोप का केले नाहीत? म्हणजे कालपर्यंत ते (चौधरी) विरोधकांसाठी चांगले होते. आज आमच्याकडे आले तर वाईट झाले? त्या प्रकरणाचा पूर्ण तपास करण्यात आला आहे. त्या तपासातून काय समोर आलं ते सर्वांनी पाहिलं आहे. मला स्थानिकांनी सांगितलं की सर्व गोष्टींची शहानिशा करूनच पक्षप्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे.”
पालघर हत्याकांडामागे भाजपाच होतं असं म्हणायचं का? रोहित पवारांचा प्रश्न
काशिनाथ चौधरी यांच्या भाजपा प्रवेशावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एक्सवर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की “पालघर साधू हत्याकांड प्रकरणी मुख्य आरोपी म्हणून भाजपाने ज्या काशिनाथ चौधरी यांच्यावर आरोप केले त्यांनाच वॉशिंग मशीनमध्ये घालून भाजपाने पक्षात घेतलं. मग पालघर हत्याकांडामागे भाजपाच होती, असं म्हणायचं का? हेच भाजपचं ढोंगी आणि बेगडी हिंदुत्व आहे. राजकारणासाठी भाजप कोणत्याही थराला जाते हे अनेकदा सिद्ध झालं आहे. कोणत्याही विषयाचं राजकारण करून भाजपा सत्तेची पोळी भाजते पण यामुळं सामाजिक संतुलन बिघडून त्याचं मोठं नुकसान राज्याला सहन करावं लागतं, याचा तरी भाजपने विचार करावा.”
दरम्यान, विरोधकांच्या टीकेनंतर काशिनाथ चौधरी यांच्या पक्षप्रवेशाला भाजपातील वरिष्ठ नेत्यांनी स्थगिती दिल्याचं वृत्त समोर आलं आहे.
