Devendra Fadnavis : महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचा व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पोस्ट केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला. ज्यानंतर माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याचीही मागणी जोर धरु लागली आहे. दरम्यान माणिकराव कोकाटे यांनी या व्हिडीओबाबत स्पष्टीकरणही दिलं आहे. मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही बाब आम्हाला भुषणावह नाही असं म्हणत प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं हे प्रकरण काय?
विधिमंडळ सभागृहात भ्रमणध्वनीवर कृषिमंत्री कोकाटे हे रमी खेळत असल्याची चित्रफित आमदार रोहित पवार यांनी प्रसारित केल्यानंतर बचाव करताना खुद्द कोकाटे आणि राष्ट्रवादीची (अजित पवार) कोंडी झाली आहे. जंगली रमी पे आओ ना महाराज म्हणत रोहित पवार यांनी खोचक पोस्ट करत हा व्हिडीओ पोस्ट केला होता. ज्यामुळे माणिकराव ठाकरेंवर चौफेर टीका झाली. ज्यानंतर माणिकराव कोकाटेंनी स्पष्टीकरणही दिलं.
माणिकराव कोकाटेंचं स्पष्टीकरण काय?
माणिकराव कोकाटे म्हणाले, “मी विधानपरिषदेत कामकाजासाठी बसलो होतो. तेव्हा सभागृह काही वेळासाठी तहकूब झाले असावे. म्हणून मी खालच्या सभागृहात (विधानसभेत) काय कामकाज सुरू आहे, हे पाहण्यासाठी मोाबाइलवरून युट्यूबवर गेलो होतो. युट्यूबवर व्हिडीओ सुरू केल्यानंतर जाहिराती येत असतात. त्याप्रमाणेच त्यावेळी सदर जाहिरात आपोआप प्ले झाली. मी जाहिरात स्किप करून पुढे गेलो. पण व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांनी फक्त १८ सेकंदाचाच व्हिडीओ दाखवला.” असं स्पष्टीकरण दिलं होतं. मात्र ही बाब आमच्यासाठी भुषणावह नाही तर अयोग्य आहे असं म्हणत आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
माणिकराव कोकाटेंच्या व्हिडीओबाबत काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
“मला वाटतं की ही बाब अतिशय चुकीची आहे. विधानभवनात आपलं कामकाज नसलं तरीही, आपण त्या ठिकाणी गांभीर्याने बसणं आवश्यक आहे. एखाद्या वेळी असं होतं की तुम्ही कागदपत्रं वाचता, इतर काही गोष्टी वाचता. पण रमी खेळतानाचा व्हिडीओ हा काही योग्य नाही. अर्थात कोकाटे यांनी रमी खेळत नसल्याचा खुलासा केला. अचानक ती पॉप अप झाली वगैरे सांगितलं आहे पण जरी त्यांनी जे काही सांगितलं असलं तरीही जे घडलं आहे ते आम्हाला भुषणावह नाही.” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी काय टीका केली?
“एकीकडे विधिमंडळाचे कामकाज सुरू आहे; प्रश्नोत्तरांचा तास सुरू आहे अन् दुसरीकडे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे जंगली रमी खेळत होते. त्याचा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर, माणिकराव कोकाटे यांच्या पहिल्या व्हिडिओत ते जंगली रमी खेळतच नव्हते जाहिरात बघत होते असे सांगण्यात येत होते. आता मी दोन व्हिडिओ देतोय. दोन्ही व्हिडिओ व्यवस्थित बघा… कुठला पत्ता कुठे आणि कसा हलवला आहे, हे दिसेल. माणिकराव कोकाटे हेच ऑनलाईन जुगाराचे पत्ते आपल्या बोटाने सरकवत आहेत. आणखी किती पुरावे हवेत ते सांगा; मागाल तेवढे पुरावे देतो. महाराष्ट्राचाच जुगाराचा डाव करून टाकलाय…!”