मी मटण खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, मग तुम्हाला काय अडचण आहे? असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळेंनी विचारला होता. त्यानंतर आता सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार टीका होते आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
सुप्रिया सुळेंचं नेमकं विधान काय?
मी रामकृष्ण हरीवाली आहे, पण माळ घालत नाही कारण कधी कधी खाते. खरं बोलते बाई, मी काही त्यांच्यासारखं खोटं बोलत नाही. मी मटण खाल्लं तर माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? खरं आहे की नाही? आमचे आई वडील खातात, नवरा खातो, सासू-सासरे खातात आणि आम्ही आमच्या पैशांनी खातो बाबा, दुसऱ्यांचं काही नाही आपलं. आपण कुणाला मिंधे नाही. जे आहे तो डंके की चोट पे है. असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
“मी याबाबत काहीही बोलणार नाही. याचं उत्तर महाराष्ट्रातले तमाम वारकरी देतील.” असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी एका वाक्यात हा विषय संपवला आहे. सुप्रिया सुळे यांनी नाशिकमध्ये झालेल्या भाषणात मी मटण खाल्लं तर माझ्या पांडुरंगाला चालतं असं म्हटलं होतं. त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे विधान केलं आहे.
भाजपा प्रवक्ते केशव उपाध्येंची पोस्ट काय?
“जेवणेंही नाम घेऊनी करावें, परि करु नये जीव हिंसा” असे संत तुकाराम महाराज सांगतात… भगवंताचे नाव घेऊन जेवण करावे, हिंसा करून, कुणाला मारून खाऊ नये, असा संस्कार देणाऱ्या तुकोबारायांच्या मराठमोळ्या महाराष्ट्रात सोयीचा विठ्ठल आणि सोयीच्या विठ्ठलभक्तीचे समर्थन करणाऱ्यांनी वारकरी संप्रदयाची थट्टा चालविली आहे. विठ्ठलभक्त वारकरी आणि त्यांच्या कुटुंबातील माळकरी कधीच मांसाहारकडे वळत नाहीत. वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेतानाच, मांसाहार वर्ज्य करण्याचे व्रत सुरू होते, आणि रोज हरिपाठाचा परिपाठ सुरू होतो. हिंसा करणार नाही, दारू पिणार नाही, दिंडी सहभाग सात्विक आहार व उपवास असे पंच नियम पाळून माळ धारण करतात, आणि पिढ्यानपिढ्या ही माळ जपली जाते. अशी पोस्ट भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे.
महाराष्ट्र भाजपाचं म्हणणं काय?
सुप्रिया ताईंनी पुन्हा एकदा पांडुरंगाचा आणि वारकऱ्यांचा अपमान केला. शरद पवार गटाचे नेते स्वतःला काय समजतात? उठ-सुठ हिंदूंच्या देवीदेवतांचा आणि परंपरांचा अपमान करतात, स्वतःला देवांचा बाप म्हणवून घेतात, छत्रपती शिवरायांच्या इतिहासाची वाट्टेल तशी मोडतोड करतात, प्रभु रामाचा अपमान करतात, हिंदूंना आराध्य असलेल्या प्रत्येक गोष्टीचा अपमान करतात. हिंदूनी निवडणुकीत यांना जागा दाखवली की मग मतदारांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतात.