Devendra Fadnavis भाजपाच्या लोकांना लग्नात बोलवू नका ते पुरणपोळ्या हाणतील, जेवणावर ताव मारतील आणि नवरीला पळवून घेऊन दुसऱ्या लग्नात पोहचतील अशी बोचरी टीका उद्धव ठाकरेंनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वर्धापन दिनाच्या भाषणात केली होती. या टीकेवरुन आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना जोरदार उत्तर दिलं आहे. एवढंच नाही तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष का फुटले ते देखील सांगितलं आहे.

उद्धव ठाकरे यांच्याबाबत काय म्हणाले फडणवीस?

उद्धव ठाकरे म्हणतात, भाजपाच्या लोकांना लग्नात बोलवू नका ते पुरपोळ्या चापतील, जेवण वगैरे छान करतील आणि लग्नातून नवरीला पळवून नेतील. याबाबत तुमचं काय म्हणणं आहे असं विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, “उद्धव ठाकरेंची समस्या अशी आहे की ते कुणाच्याही लग्नात गेले तरीही त्यांना वाटतं की तेच नवरदेव आहे. नवरदेवाला जसं वाटतं की आपल्याकडे लक्ष दिलं जावं तसंच उद्धव ठाकरेंना वाटतं की नवरदेवापेक्षा आपल्याकडे जास्त लक्ष दिलं जावं. सगळ्यात महत्त्वाचं आहे की शिवसेना सर्वात आधी कुणी फोडली? १९९२ मध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जिवंत होते आणि शरद पवारांच्या विरोधात बोलायचं त्यावेळी शरद पवारांनी छगन भुजबळ आणि १३ आमदारांना फोडलं. त्याच शरद पवारांसह युती करुन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले.” अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

उद्धव ठाकरे किंवा शरद पवार पक्ष फुटीसाठी आम्हाला दोष देऊच शकत नाहीत

उद्धव ठाकरेंचा पक्ष फुटलेला असो किंवा शरद पवारांचा पक्ष फुटलेला असो ते आम्हाला दोष देऊ शकत नाहीत. कारण एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरेंना मानणारे कट्टर शिवसैनिक आहेत. ते पक्षातून बाहेर पडलेच नसते. पण ज्यावेळी एकनाथ शिंदेंना हे कळलं की उद्धव ठाकरे आता आदित्य ठाकरेंना नेते म्हणून पुढे आणण्यासाठी आपले पंख कापत आहेत, सगळ्या प्रकाराच्या तडजोडी करत आहेत आणि जे खातं एकनाथ शिंदेंकडे होतं त्याच्या बैठकाही आदित्य ठाकरेच घेऊ लागले होते. काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर गेल्याने ते हिंदुत्वाबाबत काही बोलू शकत नव्हते. दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंचे असे पंख कापणं सुरु केलं त्यामुळे त्यांची महत्त्वाकांक्षा होतीच. राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही हेच झालं. शरद पवारांचे उत्तराधिकारी म्हणून अजित पवारांकडेच पाहिलं गेलं. पण गेल्या काही वर्षांपासून सुप्रिया सुळेंचं महत्त्व वाढू लागलं आणि अजित पवारांना व्हिलन कऱण्यात आलं. आम्ही जो पहाटेचा शपथविधी केला होता ते शरद पवारांना सगळं माहीत होतं. पण त्यांनी अजित पवारांना पुढे करुन पाठिंबा काढून घेतला. शरद पवारांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हाही शरद पवारांनी अजित पवारांनाच व्हिलन केलं. त्यामुळे आपलं राजकारण संपवलं जातं आहे हे अजित पवारांना कळलं. त्यामुळे दोन्ही पक्ष फुटले ते अंतर्गत बंडाळीमुळे फुटले. असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. इंडिया टीव्हीवरील आप की अदालत या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी हे विधान केलं आहे.