मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह नेमके कुठे आहेत? यावरून सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर गंभीर आरोप केला आहे. परमबीर सिंह यांना देशाबाहेर जाण्यासाठी केंद्रानं मदत केल्याची भूमिका नाना पटोलेंनी मांडल्यानंतर त्यावर राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे. “नाना पटोले काहीही बोलत राहतात, त्यांच्या प्रत्येक गोष्टीचं उत्तर देता येणार नाही”, असं फडणवीस म्हणाले आहेत. नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी मराठवाड्यातील अतीवृष्टीचं संकट आणि राज्य सरकारची मदत याविषयी देखील भूमिका मांडली आहे.

नाना पटोलेंना खोचक टोला

देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोले यांना खोचक टोला लगावला आहे. “नाना पटोले काहीही बोलत राहतात. त्यांच्या प्रत्येक गोष्टीचं उत्तर देता येणार नाही. नाना पटोले असे व्यक्ती आहेत की ते अमेरिकेच्या अध्यक्षांच्या बाबतीत देखील बोलू शकतात”, असं फडणवीस म्हणाले आहेत.

राज्य सरकारच्या सर्व घोषणा हवेत विरल्या

दरम्यान, मराठवाड्यात अतीवृष्टीनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर राज्य सरकारने घेतलेल्या भूमिकेवर देखील फडणवीसांनी ताशेरे ओढले. “सरकारच्या सर्व घोषणा हवेत विरल्या आहेत. कोणत्याही घोषणेची पूर्तता झालेली नाही. इतक्या नैसर्गिक आपत्तींमध्ये केलेल्या घोषणा कागदावर राहिल्या आहेत. त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत हे वास्तव आहे”, असं फडणवीस म्हणाले.

“मंत्री किंवा राज्यातील प्रमुख लोक तिथे गेले, तर प्रशासन देखील जागं होत असतं आणि लोकांना काहीतरी दिलासा मिळत असतो. अशा परिस्थितीत कुणीतरी आपलं ऐकतंय असं लोकांना वाटत असतं आणि ते महत्त्वाचं असतं. आम्ही देखील उद्यापासून मराठवाडा दौऱ्यावर जाणार आहोत. तिथली परिस्थिती सरकारपर्यंत पोहोचवून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करू”, असं देखील फडणवीस म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नजर आणेवारीवर मदत

“पहिल्यांदा नजर आणेवारीच्या आधारावरच मदत करता येते. वैयक्तिक पंचनाम्याची आवश्यकता पडत नाही. पंचनामे होत राहतील. पण आधी तातडीची मदत काय करता येईल, याचा सरकारने विचार करण्याची गरज आहे”, असं फडणवीसांनी नमूद केलं.